पीटीआय, नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ आणि ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली. ‘रेड चिलीज’ निर्मित आणि ‘नेटफ्लिक्स’वर प्रसारित होणाऱ्या बॅड्स ऑफ बॉलीवूड या वेबसिरिजमध्ये आपले अवमानकारक पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान यांच्या मालकीचे ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ आणि ‘नेटफ्लिक्स’ यांच्याडकडून दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच वेबसीरिजमधील आपली बदनामी करणारा भाग काढून टाकण्याची त्यांनी मागणी केली आहे. नुकसानभरपाईची रक्कम आपण कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला देणगी म्हणून देणार असल्याचे वानखेडेंचे म्हणणे आहे.
वानखेडेंच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. ज्येष्ठ ॲडव्होकेट संदीप सेठी आणि वकील टी सिंगदेव यांनी त्यांची बाजू मांडली. या सीरिजमुळे वानखे़डे आणि त्यांच्या कुटुंबीयांना ट्रोल केले जात असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्या. पुरुषैंद्र कुमार कौरव यांनी प्रतिवादी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, ‘नेटफ्लिक्स’, ‘एक्स’, ‘गूगल एलएलसी’, ‘मेटा प्लॅटफॉर्म’, ‘आरपीएसजी लाइफस्टाइल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि जॉन डो यांना नोटीस बजावली आणि त्यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. तसेच न्यायालयाने कोणताही अंतरिम निकाल दिला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार आहे.
