नवी दिल्ली, पीटीआय
‘हमदर्द’च्या रुह अफ्जा शरबताचा उल्लेख बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद असा करण्याचा प्रकार सद्सद्विवेकबुद्धीला धक्का देणारा असल्याची टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. त्यानंतर रामदेव बाबा यांनी समाजमाध्यमावरील याच्या संबंधित मजकूर तातडीने मागे घेण्याचे आश्वासन दिले.
‘हमदर्द नॅशनल फाउंडेशन इंडिया’ने याबाबत ‘पतंजली फूड्स लिमिटेड’विरोधात याचिका दाखल केली. तुमच्या आशिलाकडून निर्देश घ्या अन्यथा कठोर आदेश दिला जाईल असे पतंजलीच्या वकिलांना न्यायालयाने बजावले. त्यानंतर समाजमाध्यमावरील या सर्व वादग्रस्त जाहिराती तसेच मुद्रित व चित्रफिती तातडीने काढून टाकत असल्याचे त्यांनी मान्य केले. न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीला या वक्तव्याने धक्का बसला, याचा बचाव करता येणार नाही असे न्या. अमित बन्सल यांनी स्पष्ट केले. मी या चित्रफिती पाहिल्या तेव्हा माझे डोळे तसेच कानावर विश्वास बसत नाही. तसेच प्रतिवादी क्रमांक २ असलेल्या रामदेव यांनी प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनाबाबत अशी वक्तव्ये किंवा समाजमाध्यमावर मजकूर वा जाहिराती पुन्हा करणार नाहीत याची खात्री द्यावी असे न्यायालयाने बजावले.
कंपनीच्या संस्थापकांच्या धर्मावरून रामदेव यांनी लक्ष्य करू नये असे हमदर्दतर्फे युक्तिवाद करताना संदीप सेठी यांनी नमूद केले. हमदर्द हे काही धर्माचे रक्षक नाहीत असे पतंजलीकडून राजीव नायर यांनी प्रतिवाद केला. रामदेव यांना यापूर्वी अॅलोपथीला लक्ष्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्याचे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. रामदेव यांना राजकीय भूमिका घेण्यापासून रोखता येणार नाही. मात्र याबाबत प्रतिज्ञापत्र देऊ असे नायर यांनी स्पष्ट केले. त्यावर पाच दिवसांत रामदेव यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले याची पुढील सुनावणी १ मे रोजी होईल. याबाबत १५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी रामदेव यांच्याविरोधात तक्रार केली होती. सरबत जिहादच्या वक्तव्याने धार्मिक द्वेष पसरवत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
वादाचे कारण...
‘हमदर्द’ कंपनी रुफ अफ्जा सरबतामधून जे पैसे मिळवते त्यातून मदरसे आणि मशिदी बांधल्या जातात असे पतंजलीने गुलाब सरबताची जाहिरात करताना नमूद केल्याचे मुकुल रोहतगी यांनी नमूद केले. मात्र कोणत्याही उत्पादनाचे किंवा समुदायाचे नाव घेतले नसल्याचे सांगत रामदेव यांनी वक्तव्याचे समर्थन केले. हा प्रकार अप्रतिष्ठा करणारा आहे, यातून जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप हमदर्दकडून युक्तिवाद करताना रोहतगी यांनी केला. त्यांनी व्यवसाय करावा, पण आम्हाला त्रास का देता असा सवाल रोहतगी यांनी केला.