Delhi police arrested Money Heist Gang who steals Rs 150 crore Crime news : सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणाचे अनुकरण केल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) या प्रसिद्ध वेब सीरिजपासू प्रेरणा घेत दिल्लीतील एका टोळीने तब्बल दिडशे कोटी रुपयांची लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे या टोळीतील सदस्यांनी या वेब सीरिजमधील पात्रांवरून आपली नावे देखील ठेवली होती. या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या या गँगमधील अर्पित, प्रभात आणि अब्बास या सदस्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, असे सोशल मिडिया वर लोकांना आमिष दाखवून त्यांनी त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, टोळीतील सदस्यांनी काहीअंशी वेब सीरिजपासून प्रेरणा घेत स्वत:ची ओळख लपवण्यासाठी या स्क्रीन नावांचा वापर केला होता.

वकिल असलेला अर्पित हा ‘प्रोफेसर’ बनला, कंप्युटर सायन्स मास्टर्सची पदवी असलेला प्रभात वाजपयी याने ‘अमान्डा’ हे नाव धारण केलं आणि अब्बासने ‘फ्रेडी’ हे नाव घेतलं. त्यांनी सोशल मीडियावर अनेक सीक्रेट ग्रुप्स तयार केले, जेथे ते लोकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याची खोटी आश्वासने देऊन फसवत होते. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

लोकांना कसे फसवले जात होते?

त्यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अनेक ग्रुप तयार केले. जेथे त्यांनी शेअर मार्केटसंबंधी सल्ले आणि टिप्स शेअर करू लागले. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून गुंतवणुक केली तर मोठे रिटर्न्स मिळतील असे अमिष दाखवणे सुरू केले.

लहानसा प्रॉफिट मिळवून देऊन त्यांनी सुरुवातीला लोकांचा विश्वास संपादित केला. मात्र जेव्हा कोणी गुंतवणुकीसाठी म्हणून मोठी रक्कम त्यांच्या खात्यात टाकत असे तेव्हा त्याचे खाते ब्लॉक केले जात असे.

ज्यांनी त्यांचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यांना फसवण्यात आले आणि त्यांना आणखी पैसे टाकण्यासाठी धमक्या देखील देण्यात आल्या. ही पद्धत वापरून या टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांना फसवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्य बऱ्याचदा आलिशान हॉटेल्समध्ये मुक्काम करत आणि तिथून फक्त मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा वापर करून फसवणूक करत. या तपासाचा भाग म्हणून, पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या.

आत्तापर्यंत पोलिसांनी ११ मोबाईल फोन्स, १७ सिम कार्ड्स, १२ बँक पासबुक आणि चेकबुक आणि ३२ डेबिट कार्ड्स आणि अनेक ऑनलाईन व्यवहारांचे तसेच व्हॉट्सअॅप चॅट्सचो स्क्रीनशॉट्स जप्त केले आहेत.

चीनचे कनेक्शन?

या टोळीने केलेल्या व्यवहारांचे, कॉल रेकॉर्ड्सचे आणि इंटरनेट लॉग्सचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना काही महत्त्वाच्या बाबी आढळून आल्या आहेत. ज्यानुसार गँगचे संबंध नोएडा आणि गुवाहटीपर्यंत पसरलेले आहेत. तसेच या फसवणुकीच्या प्रकारात काही चीनी संशयित देखील सामील होते. पोलिसांनी सांगितले की, याच टोळीने विविध ऑनलाइन मार्गांचा वापर करून आणखी २३ कोटी रुपये लुबाडले आहेत.

पोलिसांना असा संशय आहे की, चीनमधून हे संपूर्ण रॅकेट चालवणाऱ्या चीनी आरोपींच्या एका नेटवर्कने या सायबर फसवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिस हे सध्या या टोळीचे आणखी सदस्य आणि परदेशी संबंधांचा शोध घेत आहेत.