Delhi Red Fort Blast Mastermind Umar-un-Nabi video : दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागचा सूत्रधार मोहम्मद उमर नबी याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये उमर नबी आत्मघातकी बॉम्बस्फोट (सुसाइड बॉम्बिंग) घडवून आणणं कसं योग्य आहे ते सांगतोय. हा व्हिडीओ त्याने स्वतःच चित्रित केल्याचं दिसतंय. तो म्हणाला की “आत्मघातकी हल्ला हा लोकांना नीट समजलेलाच नाही. लोक कुठे चुकतात माहितीय? बॉम्बस्फोट किंवा आत्मघातकी बॉम्बस्फोटाची कल्पना नेमकी काय आहे हे लोक समजून घेत नाहीत. खरंतर याविरोधात अनेक युक्तिवाद व विरोधाभास आहेत.”
उमर नबी म्हणाला, “सुसाईड बॉम्बरकडे (आत्मघातकी हल्ला करणारे) जग चुकीच्या नजरेने पाहतं. मुळात आत्मघातकी हल्यांबाबत मुख्य समस्या अशी आहे की एखाद्या व्यक्तीला अंदाज असतो की त्याचा मृत्यू एका विशिष्ट वेळी आणि विशिष्ठ ठिकाणी होणार आहे, तेव्हा ती व्यक्ती धोकादायक मानसिक स्थितीत असते. त्यांना असं वाटतं की मृत्यू हे त्यांचं एकमेव गंतव्य स्थान आहे. परंतु, अशी विचारसरणी किंवा अशी स्थिती कोणत्याही लोकशाही किंवा मानवीय व्यवस्थेत स्वीकार्य नसते. कारण या व्यक्ती जीवन, समाज व कायद्याच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघ करत असतात.”
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडीओ अपूर्ण आहे. व्हिडीओचा उर्वरित भाग अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे आत्मघातकी हल्ल्याबाबतची उमर नबीची उर्वरित मतं स्पष्ट झाली नाहीत. मात्र, या व्हिडीओतून त्याने त्याच्यासारख्या लोकांना मृत्यूला घाबरू नका असा सल्ला दिला आहे.
स्फोटात १५ जण ठार
लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१० नोव्हेंबर) सांयकाळी मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ च्या बाहेर एका कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. तपास यंत्रणांनी संशय व्यक्त केला होता की कारमध्ये बसलेली व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून उमर आहे.
उमर नबीनेच दिल्लीत आत्मघातकी घडवून आणला
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने उमरच्या आईचे डीएनए नमुने घेऊन कारमध्ये बसून आत्मघातकी स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीच्या डीएनएशी जुळवून पाहिले. त्यावरून सिद्ध झालं आहे की उमर हाच कारमध्ये बसला होता. त्यानेच हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या प्रकरणी अजूनही तपास चालू आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
पोलिसांनी या प्रकरणी दिल्ली, हरियाणा जम्मू-काश्मीरमधून अनेक संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी अलीकडेच फरीदाबादमध्ये २९०० किलो स्फोटकं जप्त केली होती. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण हे या हे फरीदाबादमधील विस्फोटकांच्या प्रकरणाशी जोडलेलं असल्याचं तपासात समोर आलं आहे. दरम्यान, ही स्फोटकं जप्त झाली नसती तर काय झालं असतं या विचाराने अनेकांचा थरकाप उडाला आहे.
