scorecardresearch

साडी ‘स्मार्ट ड्रेस’ नाही म्हणणाऱ्या रेस्तराँचं स्पष्टीकरण; CCTV मधून समोर आली दुसरी बाजू

रेस्तराँने आपली बाजू मांडत हा प्रकार चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडला गेल्याचं सांगितलं आहे.

Delhi Restaurant Explanation Sari is Not Smart Dress CCTV Shows Another Story gst 97
(Photo : Instagram)

दिल्लीच्या रेस्तराँचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांत व्हायरल झाला आहे. ज्यात साडी नेसलेल्या महिलेला रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता या रेस्तराँचं स्पष्टीकरण आलं आहे. हा प्रकार चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आल्याचं स्पष्टीकरण रेस्तराँने दिलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने गदारोळ घातल्यानंतर आता या घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे.

दिल्लीच्या अक्विला रेस्तराँमधील एका कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला सांगितलं की, “मॅडम आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल्सना परवानगी देतो आणि साड्या या स्मार्ट कॅज्युअल्समध्ये गणल्या जात नाहीत.” सोमवारी (२० सप्टेंबर) फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या या १६ सेकंदाच्या क्लिपनंतर सोशल मीडियावर मोठा संताप उसळला. फेसबुकवर या प्रकारचा व्हिडीओ शेअर करत अनिता चौधरी नावाच्या महिलेने असा आरोप केला आहे की, रविवारी दिल्लीच्या रेस्तराँमध्ये साडी नसल्याने मला प्रवेश नाकारण्यात आला.”

‘तो’ दावा चुकीचा! रेस्तराँने मांडली बाजू

चौधरी यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रेस्तराँला सोशल मीडियावर, तसेच झोमॅटोसारख्या फूड अ‍ॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर कॉल करणाऱ्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलं. मात्र, त्यानंतर आता या रेस्तराँने आपली बाजू मांडत अनिता चौधरी यांचा दावा चुकीचा असून हा प्रकार चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडला गेल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर रेस्टॉरंटने म्हटलं आहे की, आम्ही भारतीय समाजाचा सन्मान करण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही आमच्या पाहुण्यांचं नेहमी आधुनिक ते पारंपारिक अशा सर्व पोशाखांमध्ये स्वागत करतो.”

एका कर्मचाऱ्यावर हल्ला

बुधवारी (२२ सप्टेंबर) इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये रेस्तराँने आपली बाजू स्पष्ट करत सांगितलं की, चौधरी यांनी पोस्ट केलेली १० सेकंदांची क्लिप ही एक तास चाललेल्या संभाषणाचा भाग होती. थेट या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोस्ट करत रेस्तराँने म्हटलं की, महिलेने (अनिता चौधरी) एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याने त्यावेळची परिस्थितीचा निभावून नेण्यासाठी ड्रेस कोडबाबतची चुकीची टिप्पणी केली. सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितलं की चौधरी त्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आलं आहे आणि ‘साडी’बाबतच्या टिप्पणीबद्दल ग्राहकांची माफी मागण्यात आली आहे.

“एका महिलेने रेस्तराँला भेट दिली. तेव्हा त्यांच्या नावाचं रिझर्व्हेशन नसल्याने आम्ही त्यांना विनम्रपणे गेटवर थांबण्याची विनंती केली. तेव्हा, आम्ही त्यांना कोणतं टेबल देता येईल याबाबत अंतर्गत चर्चा केली. त्याचवेळी त्या थेट रेस्तराँमध्ये शिरल्या आणि आमच्याशी भांडू लागल्या, शिवीगाळ करू लागल्या. त्यानंतर जे घडलं ते आमच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. त्यांनी आमच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली”, असं रेस्तराँने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

‘त्या’ विधानाचं समर्थन आम्ही करत नाही

“ही परिस्थिती निभावून नेण्यासाठी आणि त्यांना बाहेर जाण्याची विनंती करताना आमच्या गेट मॅनेजरने ड्रेस कोडबाबतचं चुकीचं विधान केलं. ज्याबद्दल आमची संपूर्ण टीम माफी मागते,” असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. याचसोबत आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात साडी नेसलेल्या काही महिला या रेस्तराँमध्ये प्रवेश करत आहेत. “अक्विला हा एक स्वदेशी ब्रँड आहे. आमच्या टीमचा प्रत्येक सदस्य हा एक स्वाभिमानी भारतीय म्हणून उभा आहे. म्हणूनच, आमच्या गेट मॅनेजरने ड्रेस-कोडबाबत केलेल्या त्या चुकीच्या विधानाचं समर्थन आम्ही टीम करत नाही”, असंही रेस्तराँने म्हटलं आहे.

“आमच्या कंपनीच्या धोरणात कुठेही असं म्हटलं गेलेलं नाही की आम्ही कोणत्याही विशिष्ट पोशाखात कोणालाही प्रवेश नाकारू. आमच्या कर्मचाऱ्यांविरूद्ध संबंधित व्यक्तींनी केलेल्या हिंसाचारासाठी ही पावलं उचलण्याचा आम्हाला सर्व अधिकार आहे. आम्ही आतापर्यंत गप्प राहणं पसंत केलं होतं. मात्र, आता स्पष्टीकरण देत आहोत. भागधारकांसोबत पारदर्शकता राखण्याच्या आमच्या धोरणामुळे आम्ही आता हे विधान जारी करत आहोत”, असं रेस्तराँने आपल्या निवेदनात जाहीर केलं आहे.

Video: ‘साडी हा स्मार्ट ड्रेस नाही’ म्हणत दिल्लीतील रेस्तराँमध्ये महिलेला प्रवेश नाकारला

काय होता अनिता चौधरींचा?

अनिता चौधरी या प्रकाराबाबत लिहितात की, “दिल्लीतील एका रेस्तराँमध्ये साडी हा स्मार्ट पोशाख मानला जात नाही. अक्विला नावाच्या रेस्तराँमध्ये आम्ही साडीवर वाद घातला. बऱ्याच सबबी सांगण्यात आल्या. मात्र, मला रेस्तराँमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली नाही. कारण पारंपरिक भारतीय पोशाख असलेली साडी हा स्मार्ट पोशाख नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. माझा कधीही असा अपमान झाला नव्हता. मी फार दुखावले गेले आहे.” फेसबुक प्रोफाइलनुसार अनिता चौधरी या दूरदर्शन नॅशनलमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2021 at 14:48 IST