Delhi Schools Receive Bomb Threat : गेल्या काही महिन्यांत दिल्लीतील अनेक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांच्या घटनामुळे सर्वांचीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आता दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या प्रकरणात एका १२ वी च्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. तसेच या धमकी मागचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, एका १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी चौकशी केली असता या विद्यार्थ्याने २३ शाळांना धमकीचे ईमेल पाठवले होते. विद्यार्थ्याची चौकशी केली असता विद्यार्थ्याने आपण अशा प्रकारची धमकी दिल्याची कबूली दिली आहे. धमकीचा शेवटचा ई मेल ८ जानेवारीला पाठवण्यात आला होता असंही त्याने सांगितलं. त्यामुळे आता या सर्व धमक्या फसव्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : “कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

धमकी देण्याचं कारण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तब्बल २३ शाळांना बॉम्बची धमकी देणारे ई मेल पाठवले होते. या विद्यार्थ्याने स्वत: शिक्षण घेत असलेल्या शाळेलाही धमकी दिली होती. यावेळी त्याने ई मेल पाठवताना त्याच्या शाळेसह दुसऱ्या शाळांनाही मेल सीसी केला होता. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या चौकशीत अशी माहिती आढळून आली की त्या विद्यार्थ्याला १२ वी ची परीक्षा द्यायची नव्हती. त्यामुळे हा सर्व प्रकार केला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच स्वत: शिक्षण घेत असलेल्या शाळेला आपला संशय येऊ नये म्हणून दुसऱ्या शाळांनाही ई-मेल पाठवला होता, असंही त्याने सांगितलं. दरम्यान, शाळांना धमकी देणाऱ्या या १२ वीच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलं असून पुढील चौकशी सुरु आहे. तसेच हा विद्यार्थी नेमकी कोणत्या शाळेचा होता आणि या विद्यार्थ्याबाबत अधिक माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.