‘Terrorisers 111’ नावाने राजधानी दिल्लीतल्या किमान ५० शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अशी धमकी देणारा ई-मेल या सर्व शाळांना आला असून त्यात शाळेच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी १८ ऑगस्ट रोजीदेखील अशाच प्रकारची धमकी दिल्लीतल्या ३८ शाळांना देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष देशाच्या राजधानीतच अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं व प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या सुमारास दिल्लीतील ५० शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल आले. २५ हजार डॉलर्स तात्काळ दिले नाहीत, तर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या अशाच धमकीमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात ५ हजार अमेरिकन डॉलर्सची मागणी करण्यात आली होती. आज आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने या शाळांमध्ये शोधमोहिम हाती घेतली. धमकी आलेल्या शाळांमध्ये दिल्लीतील एसकेव्ही, आंध्र स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, फेथ अकॅडेमी, डून पब्लिक स्कूल, सर्वोदय विद्यालय अशा नामांकित शाळांचा समावेश आहे.

काय आहे धमकीच्या ई-मेलमध्ये?

या धमकीच्या ई-मेलमध्ये सविस्तर मजकूर लिहिण्यात आला आहे. “आम्ही टेररायजर १११ गट आहोत. आम्ही या शहरातील तुमच्या शाळेच्या आणि इतर शाळांच्या इमारतींमध्ये बॉम्ब ठेवले आहेत. C4 सारखे अत्याधुनिक बॉम्ब तुमच्या शाळेतील वर्ग, सभागृह, स्टाफ रूम आणि विद्यार्थ्यांच्या बसेसमध्येही लावण्यात आले आहेत. तुमची आयटी प्रणाली आम्ही हॅक केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती आम्ही मिळवली आहे. शिवाय सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही हॅक केले आहेत. तुमच्यावर आमची कायम पाळत आहे. पैसे न पाठवल्यास आम्ही सर्व ठिकाणी बॉम्बस्फोट करू”, असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

“कोणत्याही प्रकारे जीवितहानी टाळण्यासाठी सर्व शाळा आणि त्यासंदर्भातील कामकाज तातडीने थांबवून इमारती रिकाम्या करा. प्रशासनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर लगेच हे बॉम्बस्फोट केले जातील आणि तुमची गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाईल. टेररायजर १११ हा गट कधी कुणाला माफ करत नाही आणि कधीच काही विसरतही नाही. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पैसे देणं हाच एकमेव मार्ग तुमच्यासमोर आहे. त्यावर तातडीने निर्णय घ्या”, असाही इशारा या धमकीच्या ई-मेलमध्ये देण्यात आलेला आहे.