पीटीआय, नवी दिल्ली : दिल्लीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आयोजित केलेली सोमवारची सर्वसाधारण सभाही गदारोळामुळे तहकूब करावी लागली. आता निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे. ‘आप’च्या नेत्या अतिशी यांनी सोमवारी सांगितले की, महापौरपदाची निवडणूक न्यायालयाच्या देखरेखीखाली होण्यासाठी पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशित सदस्यांना मतदान करू देण्यावरून सोमवारी दिल्ली महापालिका सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्याने पुढील तारखेपर्यंत कामकाज तहकूब केली. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासाच्या विलंबानंतर सोमवारी सकाळी साडेअकराला सुरू झाले. त्यानंतर लगेचच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याचे शर्मा यांनी जाहीर केले. या घोषणेनंतर ‘आप’च्या नगरसेवकांनी विरोध सुरू केला.
सभेआधीच आरोप-प्रत्यारोप!
महापौरपदाची निवडणूक रोखण्यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना गत वेळेप्रमाणे गोंधळ घालण्याच्या सूचना दिल्या असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी दिल्ली महापालिकेचा सभेआधीच केला. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, ‘आप’नेच आपल्या नगरसेवकांना तशा सूचना दिल्या आहेत.