नेचर नियतकालिकात शोधनिबंध

नवी दिल्ली : भारतात प्रथम आढळून आलेला डेल्टा विषाणू हा करोना विषाणूचा प्रकार जास्त संसर्गजन्य असून तो प्रतिकारशक्ती प्रणालीलाही चकवा देतो. त्यामुळे विषाणूच्या काटेरी प्रथिनाचा मुकाबला करणारी प्रतिपिंडे काम करू शकत नाहीत. परिणामी त्याची संसर्गक्षमताही जास्त असते असे नेचर या नियतकालिकाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

बी .१.६१७.२ म्हणजेच डेल्टा विषाणू हा भारतात २०२० मध्ये सुरुवातीला सापडला होता आता त्याचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला असून आंतरराष्ट्रीय संशोधकांनी प्रयोगशाळेतील प्रयोग व प्रत्यक्ष लसीकरण या गोष्टींचा अभ्यास करून म्हटले आहे की, डेल्टा विषाणू हा संख्यावाढ करण्यात प्रभावी ठरत असून इतर विषाणू प्रकारांपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे.

डेल्टा विषाणूला प्रतिपिंड रोखू शकत नाहीत कारण आधी संसर्ग होऊन गेला असेल व लस घेतली असेल तरी डेल्टा विषाणूचा प्रसार कमी होताना दिसलेला नाही, असे ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठाचे रवींद्र गुप्ता यांनी म्हटले आहे.

या गुणधर्मामुळे २०२१ मध्ये करोनाचा विषाणू मोठय़ा प्रमाणावर पसरला. आधी दुसऱ्याच करोना विषाणू प्रकाराची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये डेल्टा विषाणूचा संसर्ग जास्त दिसून आला. निम्मे लोक हे आधी दुसऱ्याच विषाणू प्रकाराने बाधित झाले होते. प्रतिकारशक्ती प्रणालीस डेल्टा विषाणू कसा चकवा देतो याचा अभ्यासही यात करण्यात आला असून त्यात नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ रिसर्च बायोरिसर्च या संस्थेचा समावेश आहे. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका तसेच फायझर या लशी दिलेल्या व्यक्तींचा अभ्यास यात करण्यात आला त्यांना आधी कोविड होऊन गेलेला होता. काही रुग्णांमध्ये प्रतिपिंडांची संख्या वाढलेली दिसली. पण डेल्टा विषाणू हा प्रतिपिंडांना ५.७ पट कमी प्रतिसाद देत होता. अल्फा विषाणूच्या तुलनेत प्रतिसादाची क्षमता आठ पट कमी होती. याचा अर्थ कुठल्याही व्यक्तीला या विषाणूला रोखण्यासाठी आठ पट अधिक प्रतिपिंड लागत होते. दिल्लीतील तीन रुग्णालयात काम करणाऱ्या १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला असता सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अल्फा विषाणूच्या तुलनेत डेल्टाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला.