पीटीआय, नवी दिल्ली
गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतीक अहमद याच्या हत्येची स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. अतिक आणि अश्रफ या दोन्ही भावांची १५ एप्रिलला हत्या झाली होती. न्यायालयीन प्रक्रिया न चालवता त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप करत त्यांची बहीण आयेशा नूरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या खटल्यांच्या यादीनुसार, ३ जुलैला न्या. एस आर भट आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर आयेशा नूरी यांच्या याचिकेवर सुनावणी होईल. त्याच दिवशी अॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल. उत्तर प्रदेशात २०१७ पासून झालेल्या १८३ पोलीस चकमकींची चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.
याप्रकरणी २८ एप्रिलला सुनावणीदरम्यान, अतिक आणि अश्रफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर का नेले होते, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला होता. पत्रकार असल्याची बतावणी करणाऱ्या तिघांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला होता, त्यात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला होता. या दोघांना रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती मारेकऱ्यांना कशी मिळाली, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला होता. याप्रकरणी चौकशीसाठी त्रिसदस्यीय आयोग नेमल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्याशिवाय उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष तपास पथकदेखील (एसआयटी) याचा तपास करत असल्याचे वकिलांनी सांगितले होते.