वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिनेट सभागृहात काठावरचे ५१-४९ बहुमत मिळाल्याचा डेमोक्रॅटिक पक्षाचा आनंद अवघा ७२ तासच टिकला. कारण अरिझोना येथील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट सदस्य किस्र्टेन सिनेमा यांनी पक्षत्याग करून अपक्ष सदस्य राहण्याचा निर्णय घेतला आहे. ४६ वर्षीय सिनेमा यांची राजकीय भूमिका अशीच कोडय़ात टाकणारी आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर रिपब्लिकन पक्षाची बाजू उचलून धरली आहे. मात्र, त्यांनी डेमोक्रॅटिक पक्ष सोडल्याची जाहीर घोषणा केल्यानंतर डेमॉक्रॅटिक पक्षाचे सिनेटमधील बहुमत अडचणीत आले आहे. रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाचे सभागृहातील बलाबल आता जवळपास समसमान झाले आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाचे वेस्ट व्हर्जिनियाचे सिनेट सदस्य ज्यो मान्चिन हेसुद्धा अनेक मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाकडे झुकलेले असतात.
प्रथमच सिनेट सदस्य बनलेल्या सिनेमा यांनी आपली भूमिका जाहीर करताना म्हंटले, की अमेरिकन नागरिकांना ‘डेमोक्रॅटिक’ व‘‘रिपब्लिकन’ अशा दोन पक्षांचे पर्याय सांगितले जातात. या पक्षांपैकी कोणताही पर्याय निवडल्यावर त्या पक्षाची सर्व ध्येयधोरणे आपल्याला स्वीकारावी लागतात, प्रसंगी यातील काही धोरणे टोकाची किंवा अतिरेकी स्वरूपाची असतात. मात्र अरिझोनावासीयांना माझी पक्षनिवड चुकीची वाटते. मी अमेरिकन लोकप्रतिनिधीगृह-सिनेटवर निवडीसाठी इच्छुक होते तेव्हाच पक्षनिरपेक्ष राहून काम करण्याचा संकल्प केला होता. अनुकूल परिणाम साधण्यासाठी अथवा योग्य काम साध्य करण्यासाठी कुणाबरोबरही काम करण्यास माझी तयारी आहे. ज्यांच्याशी माझे मतभेद आहेत त्यांची विनाकारण नकारात्मक प्रतिमा मी रंगवणार नाही. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या नाटकांमध्ये मी वाहवत जाणार नाही असाही संकल्प मी केला होता.
पक्षत्याग करणे, पक्षांतर करणे असे भारतीय राजकारणातील प्रचलित प्रकार अमेरिकेत अपवादानेच घडतात. दशकभरापूर्वी पेनसिल्वानियाचे लोकप्रतिनिधी अर्लेन स्पेक्टर यांनी रिपब्लिकन पक्षत्याग करून डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी दशकभरापूर्वी २००० मध्ये कनेक्टिकटचे लोकप्रतिनिधी ज्यो लायबरमन यांनी पक्षत्याग करून अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला होता.
राजकीय पक्ष सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांचे जीवनमान उंचावण्याऐवजी विरोधी पक्षांना पराभूत करण्यावरच लक्ष केंद्रित करतात. जे पराभूत होतात तेही अमेरिकेचे नागरिकच असतात, याकडे या राजकीय चढाओढीत दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक अरिझोनावासीयांनी मोडकळीस आलेल्या कालबाह्य पक्षीय राजकारणास नाकारले आहे. मीही त्यांच्यात सामील होऊन ‘अपक्ष’ होऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
– किस्र्टेन सिनेमा, अरिझोना येथील सिनेट सदस्य