देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होत आहेत. नोटाबंदीमुळे बँक कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, असे विनंती राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने (एनओबीडब्ल्यू) निवडणूक आयोग आणि अर्थमंत्रालयाकडे केली आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या या संघटनेने मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांना यासंबंधी पत्र पाठवले आहे. बँक कर्मचाऱ्यांना निवडणुकांची कामे देऊ नयेत, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी गेल्या ५० दिवसांत १२ ते १८ तास काम केले आहे. अद्यापही त्यांची या कामातून सुटका झालेली नाही. उशिरापर्यंत कार्यालयांमध्ये थांबून ते प्रलंबित कामे मार्गी लावत आहेत. तसेच जुन्या नोटांची आकडेवारी आणि माहिती जमा करण्याचे काम करत आहेत. त्यांना नोटाबंदी आणि आर्थिक वर्षाची अखेरी असल्यामुळे ती कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे निवडणूक काम देण्यात येऊ नये, असे बँक संघटनेने अर्थमंत्रालय आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बँक कर्मचाऱ्यांना जर निवडणूक कामाला जुंपले गेले तर बँकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होईल. तसेच बँक कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. पण या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर गर्दी केली होती. बँकांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबून काम करावे लागत होते.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetisation bank employees appeal for no duty in assembly elections
First published on: 11-01-2017 at 20:14 IST