संपूर्ण देश नोटाबंदीच्या निर्णयामुळे होरपळत असताना मुलीच्या लग्नासाठी कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करणारे कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जनार्दन रेड्डी यांच्याकडे चालक म्हणून कामाला असणाऱ्या रमेश गौडा याने आत्महत्या केली होती. मात्र, आता या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठी जनार्दन रेड्डी यांनी एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीने तब्बल १०० कोटी रूपयांचा काळा पैसा पांढरा केला होता. हे सगळे कशाप्रकारे करण्यात आले याची माहिती रमेश गौडाला होती. त्यामुळे रेड्डी आणि संबधित अधिकाऱ्यांकडून त्याचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचे रमेशने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. ‘सीएनएन १८’ न्यूजच्या माहितीनुसार रमेशने विष पिऊन आत्महत्या केली होती. गौडा याच्या दाव्याप्रमाणे रेड्डीने काळा पैसा पांढरा करण्यासाठी अधिकाऱ्याला २० टक्के कमिशन दिले होते, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा शाही विवाह गेल्या महिन्यात पार पडला होता. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी चलनाची चणचण भासत असताना विवाह समारंभावर इतका खर्च कसा करण्यात आला त्याबद्दलही उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या विवाह सोहळ्यापासून दूर राहण्याचा आदेश भाजपच्या नेत्यांना देण्यात आला होता, तर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी विवाह समारंभातील खर्चावर बारीक लक्ष ठेवून होते. खाणसम्राट रेड्डी हे भाजपचे माजी नेते असून २००८ ते २०११ या कालावधीत ते कर्नाटकचे मंत्री होते. खाण घोटाळ्याप्रकरणी रेड्डी यांनी तीन वर्षे तुरुंगवास भोगला असून सध्या ते जामिनावर सुटले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते टी. एम. मूर्ती यांनी या विवाहसोहळ्याबाबत प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली होती. रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिने विवाह सोहळ्यासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा शालू परिधान केल्याची चर्चा होती. विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी एलसीडी स्क्रीन कार्ड तयार करण्यात आले असून एका खोक्यात निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली होती. खोका उघडल्यानंतर रेड्डी कुटुंबीयांवरील गाणे सुरू होते आणि त्याद्वारे विवाहाचे निमंत्रण देण्यात आले. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंगळुरू पॅलेस मैदानावर हा सोहळा पार पडला आणि प्रवेशद्वारापासून पाहुण्यांसाठी ऐषारामी बैलगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनाच्या कक्षाची बेल्लारी गावासारखी रचना करण्यात आली होती. बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथकही तैनात करण्यात आले होते. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी तिरुपती-तिरुमला मंदिरातील पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2016 रोजी प्रकाशित
जनार्दन रेड्डींच्या मुलीच्या लग्नासाठी १०० कोटींचा काळा पैसा पांढरा; ड्रायव्हरची आत्महत्या
हे सगळे कशाप्रकारे करण्यात आले याची माहिती रमेश गौडाला होती.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा

First published on: 07-12-2016 at 15:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetisation karnataka man commits suicide accuses reddy kas officer of harassment in suicide note