उपचार व्यवस्था अपुरी
नवी दिल्ली व आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून सरकारने कमी पैशात चाचण्या करण्याचे दिलेले आदेश रुग्णालयांनी धुडकावले आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीत डेंग्यूचा हा सर्वात मोठा उद्रेक आहे व तेथे रुग्णांसाठी बिछाने व डॉक्टर्स कमी पडत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आसपास गेली आहे.
डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकारने जनकपुरी, अशोक विहार व ताहिरपूर येथील रुग्णालयात ६०० खाटा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. ९६० खाटांपैकी ३७० डेंग्यूच्या सहाशे रुग्णांनी व्यापल्या आहेत. नऊ वॉर्डात डेंग्यूचे रुग्ण आहेत असे बारा हिंदूराव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. खुराणा यांनी सांगितले. गुरू तेगबहादूर रुग्णालयासह डॉक्टरांना अतिरिक्त वेळ काम करावे लागत आहे. दोन-तीन रुग्ण एका खाटेवर अशी परिस्थिती आहे. सध्या मर्यादित वॉर्डामध्ये डेंग्यू रुग्णांना घेतले जात आहे. सफदरजंग रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपवून सलाईन दिले जात आहे. दरम्यान सरकारने खासगी रुग्णालयात खाटांची क्षमता १० ते २० टक्के वाढवण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत चौदाजण यात मरण पावले आहेत. १९०० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. अविनाश राऊत व अमन शर्मा यांचा डेंग्यूने गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला होता. अविनाशच्या आई-वडिलांनी त्यामुळे आत्महत्या केली. दिल्ली सरकारने सर्व डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा रद्द केल्या आहेत. त्यात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2015 रोजी प्रकाशित
दिल्लीत डेंग्यूचे दोन हजार रुग्ण
अनेक ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 18-09-2015 at 03:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue patients increase in delhi