Employee Stabs Colleagues: सुट्टी नाकारली म्हणून पश्चिम बंगालमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या चार सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्याची घटना घडली आहे. आरोपी अमित कुमार सरकार हा राज्य सरकारचा कर्मचारी आहे. सरकार आपल्या हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन चालत जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्यावरील इतर लोक त्याला चाकू टाकून देण्यासाठी सांगत आहेत. मात्र सरकार तावातावात चालत जाताना दिसतो. बिधान नगर पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे.

अमित सरकार हा कोलकाताच्या न्यूटाऊन परिसरातील कारीगरी भवनमधील तांत्रिक शिक्षण विभागात काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने वरिष्ठांकडे सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र त्याची सुट्टी नामंजूर करण्यात आली. त्यामुळे त्याचे संतुलन बिघडले आणि त्याने वरिष्ठ व सहकाऱ्यांसमवेत बाचाबाची केली. यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर सरकारने चार सहकाऱ्यांवर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. ६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

अमित सरकारच्या हल्ल्यात कारीगर भवनाचा एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला. या हल्ल्यानंतर सरकार कारीगर भवनातून निघाला आणि रस्त्यावरून चालत जात असतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी त्याच्या पाठीवर आणि हातात एक बॅघ असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या हातात चाकू आहे. रस्त्याने चालत असताना तो आजूबाजूच्या लोकांना जवळ न येण्याबाबत धमकावत असल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीत सांगितले की, सुट्टी मागितली असता सहकाऱ्यांनी त्याच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्यातून हे कृत्य घडले. पोलिसांनी आरोपी आणि जखमी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपीने शस्त्र कुठून आणले, याचाही तपास केला जात आहे. तसेच आरोपी अमित कुमार सरकार याच्या मानसिक स्थितीचीही तपासणी करण्यात येत आहे.