भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण होऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे ‘कुरापतखोर उद्योगी’ हीच हे संबंध सुधारण्यातील खरी अडचण आहे, असे विधान भारताचे मावळते राष्ट्रीय संरक्षण उपसल्लागार नेहचल संधू यांनी केले. तसेच आता पुन्हा एकदा पाकिस्तानातील ‘लाँचिंग पॅडस्’ सक्रिय केली जातील आणि घुसखोरीचे मोठे प्रयत्न सुरू होतील, असा नव्या सरकारसाठी धोक्याचा इशाराही संधू यांनी दिला.
पाकिस्तानात २०१३च्या मध्यास नवे लोकनिर्वाचित सरकार आले असले तरीही तेथील ‘अस्वस्थ कुरापतखोर’ भारताविषयी पाकिस्तानात कटुता निर्माण व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहेत. एकीकडे देशात उन्हाळा वाढीस लागला असताना त्याचा फायदा घेत दहशतवाद्यांकडूनही घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये आता वाढ होताना दिसेल, असे संधू यांनी नमूद केले. सीमा सुरक्षा दलाने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
बंधने शिथिल
भारतात हिंसाचार घडविणाऱ्या दहशतवादी गटांना आजही पाकिस्तानात उत्तम ‘व्यासपीठ’ उपलब्ध होत आहे. पाकिस्तानातील जमात उद् दावा ही त्यातीलच एक संघटना. मुंबई हल्ल्यात सक्रिय असलेल्या या संघटनेतील अतिरेक्यांना पायबंद घालण्याऐवजी त्यांच्यावरील बंधने ‘शिथिल’ करण्यात आली आहेत, असा आरोप भारताच्या गुप्तचर खात्याचे माजी संचालकही असलेल्या संधू यांनी केला.
बांगलादेशातूनही धोका
पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांच्याच काही शाखा बनावट नावांनी बांगलादेशात कार्यरत आहेत. भारताने या शेजारील राष्ट्राशी संबंध सुधारणे गरजेचे आहे. कारण येथील सीमावर्ती भागातूनही भारतात घुसखोरीचे जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे, असा सावधानतेचा इशाराही संधू यांनी नव्या सरकारला दिला.