पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गुरुवारी वार्षिक परिषदेत संरक्षण व अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. मोदी यांच्या रशिया भेटीत संरक्षण व्यवहाराबाबत महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.
भारत व रशिया यांच्यातील ही सोळावी परिषद क्रेमलिनमध्ये केवळ या दोन नेत्यांपुरत्या मर्यादित असलेल्या भेटीने सुरू झाली. त्यानंतर दोन्ही देशांची संबंधित प्रतिनिधीमंडळे त्यात सहभागी झाली.
संरक्षण क्षेत्रातील व्यवहाराबाबत अनेक करार करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न असून, हे विषय बैठकीत चर्चेला आले. संरक्षण क्षेत्रातील काही संयुक्त उपक्रमांसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यास रशिया तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कामोव्ह- २२६ टी हेलिकॉप्टर दोन्ही देशांनी मिळून तयार करण्यासही रशिया तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दोन देशांदरम्यानच्या या बैठकीत परस्पर आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या मार्गाबद्दलही चर्चा झाली. सध्या दोन देशांमध्ये असलेला १० अब्ज अमेरिकी डॉलर्सचा वार्षिक वापर येत्या १० वर्षांमध्ये ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा या बैठकीचा उद्देश होता. भारतासोबत आर्थिक सहकार्य वाढवण्यास रशिया उत्सुक आहे. युक्रेनमधील संकटानंतर पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या र्निबधामुळे कमी झालेला रशियाच्या आर्थिक वाढीचा वेग वाढवण्याचे पुतीन नेटाने प्रयत्न करत आहेत.