अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाकडून मला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी कट रचला जात आहे. मात्र सामने खेळण्यासाठी मी पुरेसा तंदुरुस्त आहे, अशी ग्वाही अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने दिली आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शहजादच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र त्यातून सावरत शहजाद ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांत खेळला. परंतु त्यानंतरच्या न्यूझीलंड सामन्यापूर्वी शहजाद हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुढील सामने खेळू शकणार नसल्याची घोषणा करण्यात आली.
‘‘मी तंदुरुस्त असताना कुणी मी दुखापतग्रस्त असल्याची घोषणा का करावी? अफगाणिस्तान क्रिकेट मंडळातील काहींना मी नको आहे का? या निर्णयाची कल्पना केवळ कर्णधार, व्यवस्थापक आणि डॉक्टरांना होती. संघाच्या प्रशिक्षकांनाही हा निर्णय उशिरा कळवण्यात आला होता,’’ असेही शहजादने म्हटले आहे.
न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी सराव केल्यानंतर मी माझा मोबाइल बघितला तर त्यावर गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी विश्वचषकात खेळणार नसल्याचा संदेश त्यावर आला होता. संपूर्ण संघातील कुणाही सदस्याला त्याबाबत माहिती नव्हती. माझ्यासह सर्वानाच हा मोठा धक्का होता,’’ असेही शहजादने नमूद केले.