बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) वाद उद्भवला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने देशभरात ही मोहीम लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्या राज्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत किंवा होणार आहेत, ‘एसआयआर’ प्रक्रिया लागू करणार नाही. कारण स्थानिक निवडणूक यंत्रणा त्यात व्यग्र असल्याने ते एसआयआरवर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. पण २०२६ मध्ये आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशांसह पहिल्या टप्प्यात इतर काही राज्यांमध्ये एसआयआर मोहीम राबवण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की, सर्व राज्यांमध्ये ‘एसआयआर’ सुरू करण्याचे नियोजन असून त्याच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल.