Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गोव्यात उपस्थिती होती. “मी आज तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी आलो आहे की मागच्या काळात तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला. आता आज नवीन मागण्या आल्या आहेत. समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे. समाजाचे नेते हे जर समाधानी झाले तर समाजाचं कल्याण होत नाही. एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मांडलीच पाहिजे. आज इथे ७६ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी २४ मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. त्या आपण केंद्राकडे पाठवू. २५ ते २६ मागण्या महाराष्ट्राकडे करण्यात आल्या आहेत त्यावर आपण काम करु. तर बाकीच्या मागण्या या गोवा सरकारकडे करण्यात आल्या आहेत. काही झालं तरीही ओबीसी समाजासाठी काम करणारच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसींसाठी लढा देणारच-फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना जात नसते. पण योगायोगाने नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहेत. आपल्याला राष्ट्रीय स्तरावर ओबीसींचा बोलबाला झाल्याचे आपल्याला बघायला मिळालं. हेच नाही तर स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त ओबीसींना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिलं. माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर टीका झाली. मला टार्गेट करण्यात आलं. मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार आहे आणि माझी लढाई चालूच राहणार आहे. एका समाजासाठी आवाज उठवला म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात बोलतो आहे असं म्हटलं जातं पण माझं धोरण तसं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाने २७ टक्के आरक्षण समाजाला दिलं-फडणवीस

मी आज मुख्यमंत्री आहे, मला ओबीसी समाजासह सर्व समाजाने आशीर्वाद दिला. एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्याविरोधात आहे, असे चित्र रंगवणे चुकीचे आहे. आम्ही ओबीसी समाजासाठी ५० महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समाजाला त्याचे आरक्षण परत मिळाले. काही लोक याच्याविरोधात कोर्टात केले. कोर्टाने महत्वाचा निर्णय देत ओबीसींना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण दिलं. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी महासंघाची सुरूवात २००५ मध्ये एका छोट्याशा खोलीतून झाली. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. संधीचा उपयोग करून ओबीसींसाठी चांगले निर्णय घेईल. साततत्याने माझा संबंध हा ओबीसी महासंघाशी होता. आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुरूवात आपण केली आणि आता अनेक विद्यार्थी त्याला लाभ घेऊन विदेशात शिक्षण घेत आहेत अशीही आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.