नवी दिल्ली : दिल्लीतील प्रतिष्ठित नवीन महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांचा खालावलेला दर्जा, प्रशासनाचा ढिसाळ कारभार तसेच, इतर समस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची मी माहिती घेत असून सदनामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत, त्यासाठी मी लक्ष घालत आहे, असे फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नवीन महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनेचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले होते. त्याची राज्य सरकारच्या स्तरावर तातडीने दखल घेतली गेली. सदनाचे प्रशासन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अखत्यारित येते. या मंत्रालयाची जबाबदारी भाजप नेत्याकडे आहे. मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून गुरुवारी ते जुन्या महाराष्ट्र सदनात आले होते. तिथे त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भातील कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी ‘लोकसत्ते’तील महाराष्ट्र सदनासंदर्भातील वृत्ताची दखल घेत, या प्रकरणामध्ये वैयक्तिक लक्ष घातले असल्याचे स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन महाराष्ट्र सदनामधील एक दिवसाच्या वास्तव्यासाठी ६ हजार रुपये मोजावे लागतात पण, त्या तुलनेत तेथील सोयी-सुविधांचा दर्जा योग्य नसल्याच्या अनेक तक्रारी वारंवार होत आहेत. गरम पाण्याची सुविधा, वाय-फाय, भोजन अशा विविध मुद्द्यांकडे सदन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.