छतरपूर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलिकडच्या काळात सातत्याने चर्चेत आहेत. याचदरम्यान, त्यांनी त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती दिली आहे. इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीचा एका कार्यक्रमात उत्पन्नाबद्दलचा प्रश्न विचारल्यावर शास्त्री म्हणाले की, माझा काही फिक्स इन्कम नाही. जितके सनातनी लोक आहेत तीच माझी कमाई. आता त्याचा हिशेब तुम्ही स्वतः करा.

शास्त्री म्हणाले की, माझं काही निश्चित उत्पन्न नाही. कारण आमची कुठलीही कंपनी अथवा व्यवसाय नाही. भक्त जी दक्षिणा देऊन जातात तेच पैसे बागेश्वर धामकडे असतात. खरंतर आमच्याकडे कोट्यवधी सनातनी लोकांचं प्रेम आहे, कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद आहे. संतांचा आशीर्वाद आहे, इतकीच आमची कमाई आहे. जितके सनातनी तितकी आमची कमाई. त्याचा हिशेब तुम्ही करा.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, भक्तांकडून, शिष्यांकडून काही घेणं चुकीचं नाही. जे काही घेताय त्याचा सदुपयोग की दुरुपयोग होतोय ते महत्त्वाचं आहे. जर कोणी काही देत असेल तर आम्ही त्याचा स्वीकार करतो. गुरू म्हणून आम्ही त्यांचं प्रेम स्वीकारतो. जिथे हाताचा अंगठा देखील गुरूला दिला जातो अशा परंपरेतले लोक आहोत आपण.

धीरेंद्र शास्त्रींविरोधात अनिसची पोलिसात तक्रार

धीरेंद्र शास्त्री अलिकडेच महाराष्ट्रात नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. १३ जानेवारी रोजी त्यांचा नागपुरात कार्यक्रम संपणार होता. परंतु त्यांनी तो कार्यक्रम दोन दिवस आधीच संपवून पळून गेले. कारण त्यांनी चमत्कार करण्याचा दावा केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना चमत्कार करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. तसेच त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील केली होती. अंधश्रद्धा आणि देव-धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप शास्त्री यांच्याविरोधात अनिसने केला होता.

हे ही वाचा >> राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली बदली

धीरेंद्र शास्त्री यांची संपत्ती किती?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती अलिकडेच झी न्यूजने दिली आहे. शास्त्री रामकथा आणि प्रवचन सांगतात. एका कथेसाठी ते ८ हजार रुपये घेतात. शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. परंतु शास्त्री यांचं म्हणणं आहे की, ते या पैशांचा वापर भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करतात. तसेच ते एक गोशाळा देखील चालवतात.