Operation Sindoor : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे २६ नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली होती. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रप्म यांनी त्यांच्या मध्यस्थीने ही शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलं होतं. तसेच दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचंही ट्रप्म म्हणाले होते. दरम्यान, त्यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते. तसेच शस्त्रसंधीवेळी पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रप्म यांच्यात फोन झाला होता का? असे सवालही उपस्थित करण्यात येत होते.

दरम्यान, आता पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रप्म यांच्यात फोनवरून संवाद झाला होता की नाही? याचा खुलासा आता देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत बोलताना केला आहे. २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रप्म यांच्यात कोणताही संवाद झाला नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान बोलताना दिलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओंशी संवाद साधल्यानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचं स्पष्टीकरण याआधीही भारताने दिलं होतं.

“आपली विमानं किती पडली?”, राजनाथ सिंह काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, “आजही आपले विरोधक विचारतात पाकिस्तानने भारताची किती विमानं पाडली ते सांगा. मला वाटतं राष्ट्रीय जनभावनेचा हा अनादार आहे. कारण त्यांनी एकदाही आम्हाला हे विचारलं नाही की आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानची किती विमानं पाडली? मी विरोधकांना हे सांगू इच्छितो की त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी हे जरुर विचारावं की भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले का? तर त्याचं उत्तर आहे हो. मी विरोधी पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? तर त्याचं उत्तर आहे होय, ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भगिनींचं कुंकू पुसलं त्यांच्या आकांना, म्होरक्यांना ठार करण्याचं काम आपण केलं का? तर त्याचं उत्तर आहे होय. प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले जवान जखमी झाले का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जेव्हा लक्ष्य मोठं असतं तेव्हा छोट्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरबाबत चुकीचे प्रश्न विचारत असतील तर मी त्यांना काय उत्तर देऊ? मी चार दशकं राजकारणात आहे. मी शत्रुता पूर्ण राजनीती कधीही पाहिलेली नाहीठ, असंही राजनाथ सिंह म्हणाले.