पीटीआय, चंडीगढ : भ्रष्टाचारप्रकरणी पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी मंत्रीपदावरून बडतर्फ केले.  या कारवाईनंतर सिंगला यांना तात्काळ अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यानंतर सिंगला यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती़  मात्र, सिंगला हे आरोग्य खात्यातील साहित्य खरेदी आणि निविदांमध्ये एक टक्का कमिशनची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याचे भगवंत मान यांनी सांगितल़े बडतर्फीची कारवाई केल्यानंतर मान यांनी याबाबत पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल़े  त्यानंतर गुन्हा नोंदवून सिंगला यांना पोलिसांनी अटक केली.

 सिंगला यांच्या भ्रष्टाचाराबाबत एका अधिकाऱ्याने दहा दिवसांपूर्वी मान यांच्याकडे तक्रार केली होती़  त्यानुसार मान यांनी सिंगला यांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवले होत़े  ते भ्रष्टाचार करत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, सिंगला यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिल्याचे मान यांनी सांगितल़े. आम आदमी पक्षाचे सरकार एका रुपयाचाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही़  आपल्याला पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे, असे भगवंत मान म्हणाले.

भ्रष्टाचाऱ्यांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनीही २०१५ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची हकालपट्टी केली होती़  आता सिंगला यांची हकालपट्टी करण्याच्या मान यांच्या निर्णयाचे केजरीवाल यांनी स्वागत केल़े  भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा इशारा आम आदमी पक्षाने या कारवाईतून दिला आहे.