पीटीआय, नवी दिल्ली

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पक्षाला देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे उघड करण्यास अनेक राजकीय पक्षांनी नकार दिला. त्यासाठी विविध कायदेशीर तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. तर, आपल्याकडे कोणत्याही नावाशिवाय ‘ड्रॉप बॉक्स’ किंवा टपालाद्वारे रोखे प्राप्त झाले असे काही राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले.

द्रमुकला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या ६५६.५० कोटींपैकी तब्बल ५०९ कोटी ‘लॉटरी किंग’ सांतियागो मार्टिनच्या मालकीच्या ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स प्रा. लि.’कडून मिळाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, द्रमुकने देणगीदारांकडून तपशील मागवले आहेत. काँग्रेसने भारतीय स्टेट बँकेला पत्र लिहून निवडणूक रोख्यांचे देणगीदार, मिळालेली रक्कम, निधी जमा झालेले बँक खाते आणि तारीख याविषयीचे तपशील मागवले आहेत. त्यावर, प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक रोख्यांचे तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे उत्तर स्टेट बँकेने काँग्रेसला दिले आहे.

हेही वाचा >>>तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांचा राजीनामा, भाजपाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता!

दुसरीकडे, भाजपने देणगीदारांची नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे. त्यासाठी पक्षाने लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ तसेच भारतीय रिझव्‍‌र्ह बँक कायदा आणि प्राप्तिकर कायदा या कायद्यातील दुरुस्त्या आणि विविध तरतुदींचे कारण दिले आहे. ‘‘राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीचा हिशोब ठेवतानाच देणगीदारांना कोणत्याही परिणामांचा सामना करावा लागू नये यासाठीच निवडणूक रोखे योजना सुरू करण्यात आली होती’’, असे भाजपने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

समाजवादी पक्षाने एक लाख रुपये आणि १० लाख रुपये अशा तुलनेने लहान रकमांच्या रोख्यांचे तपशील जाहीर केले आहेत. तर प्रत्येकी एक कोटींच्या १० रोख्यांचा केवळ उल्लेख केला असून ते रोखे कोणी दिले ही नावे जाहीर केलेली नाहीत. तेलुगू देसम पक्षाने आपल्याकडे देणगीदारांची नावे लगेचच उपलब्ध नाहीत असे कळवले आहे.

हेही वाचा >>>‘अजान’च्यावेळी मोठ्या आवाजात संगीत वाजविल्याने युवकाला मारहाण, तीन जणांना अटक

तृणमूल काँग्रेसने असे उत्तर दिले आहे की, हे निवडणूक रोखे आपल्या पक्षाच्या कार्यालयात पाठवण्यात आले होते आणि ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकण्यात आले होते. त्याशिवाय काही रोखे दूतांच्या मार्फत पाठवण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) पक्षाने देणगीदारांचे तपशील ठेवलेले नाहीत किंवा पावत्याही दिलेल्या नाहीत त्यामुळे आपल्याकडे हे तपशील नाहीत असे सांगितले आहे. राष्ट्रीय जनता दलाने दीड कोटींच्या देणगीचे तपशील लगेचच उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. तर आपल्या पक्षाला २०१९मध्ये १० कोटी रोख्यांद्वारे मिळाल्याचे संयुक्त जनता दलाने कळवले आहे.