बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढ चालला असल्याचे मंगळवारी जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी मान्य केले. हा दुरावा दूर करण्यासाठी मांझी यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी असलेला दुरावा दूर करण्यासाठी मांझी यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे, कारण मंत्रिमंडळ त्यांचेच असून तेच सरकार चालवत आहेत, असेही सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. मांझी यांच्या काही वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आला असल्याने त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये टाळण्याचे सांगण्यात आले आहे. रस्ताबांधणी विभागातील कामकाजाबद्दल मांझी समाधानी नव्हते त्यामुळे त्यांनी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि त्याचे समर्थन केल्याने पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आले. रस्तेबांधणी विभागाचे मंत्री राजीव रंजन सिंह लल्लन असून ते माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कट्टर समर्थक आहेत.सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे नियमांचा भंग झाल्याची लेखी तक्रार लल्लन आणि पी. के. शाही या मंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी मांझी यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यामागेही राजकारण असल्याचे जद(यू)ला वाटत आहे.