एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या महासाथीने २०२० या वर्षांवर सर्वाधिक प्रभाव टाकला. अनेकांचे आयुष्य या काळात आमूलाग्र बदलले. या काळात आरोग्य यंत्रणांवर आलेला ताण, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, करोना योद्धय़ांची धडाडी, बेरोजगारी, अफवा आणि मृत्यूंचे प्रमाण याभोवती बातम्या फिरत होत्या. १६व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम ॲवॉर्डस’ सोहळय़ामध्ये याचे प्रतिबिंब उमटलेले पाहायला मिळेल. याखेरीज सायबर सुरक्षा, वातावरण बदल, खेळाडूंचे लैंगिक शोषण, हाथरस सामूहिक बलात्कारानंतर निर्माण झालेली परिस्थिती या विषयांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

नवी दिल्लीमध्ये आज, बुधवारी २०१९ आणि २०२० या दोन वर्षांच्या विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आदींनी या सोहळय़ांमध्ये विजेत्यांना गौरविले आहे. २०१९च्या पुरस्कारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र करोनाच्या साथीमुळे विजेत्यांना प्रत्यक्ष पुरस्कार देणे शक्य झाले नव्हते. यंदाच्या सोहळय़ात दोन वर्षांमधील एकूण ४३ विजेत्यांना गौरविण्यात येईल.

रामनाथ गोएंका फाऊंडेशनमार्फत देण्यात येणाऱ्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डस’च्या माध्यमातून ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’च्या संस्थापकांच्या विचारांचा वारसा जपला जातो. दरवर्षी पत्रकारितेमधील सर्वोत्तम योगदान देणाऱ्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. मुद्रित, डिजिटल आणि दूरचित्रवाणी या तीन्ही प्रकारांमध्ये शोधपत्रकारिता, राजकीय, क्रीडा क्षेत्रांचा समावेश असून पुस्तके, लेख आणि प्रादेशिक भाषांसाठीही पुरस्कार दिला जातो.

यंदाच्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम ॲवॉर्डस’ची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण, प्रा. डॉ. सी. राज कुमार, ओ. पी. जिंदाल जागतिक विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू ओ. पी. जिंदाल, माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू के. जी. सुरेश यांचा समावेश आहे.

विजेत्यांच्या निवडीबाबत कुरेशी म्हणाले, की आधीच्या वर्षांपेक्षा यंदा असलेल्या बातम्यांच्या दर्जामध्ये कोणतीही कमतरता नाही. एकापेक्षा एक सरस बातम्यांची विस्तृत श्रेणी आहे. माझ्या मते पत्रकार जेव्हा सामाजिक प्रश्नांवर बातम्यांची मालिका सादर करतात, तेव्हा त्यातील एक बातमी सर्वोत्तम ठरते. यंदा ज्यांना पुरस्कार मिळणार नाही, त्यांनी निराश होऊ नये आणि पुढल्या वर्षी जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रा. डॉ. राज कुमार म्हणाले, की ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम ॲवॉर्डस’साठी परीक्षक होणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. इंडियन एक्स्प्रेसने जपलेल्या पत्रकारितेतील नैतिकतेमुळे मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे निडरपणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना शोधून त्यांचा गौरव करण्याची इंडियन एक्स्प्रेसची भूमिका खरोखर स्पृहणीय आहे. यंदाच्या प्रवेशिकांची विस्तृत श्रेणी बघता परीक्षकांचे काम अवघड होते, अशी पुष्टीही कुमार यांनी जोडली. ‘‘प्रामाणिकपणा आणि शौर्याची कथा सांगणाऱ्या यातील काही बातम्या प्रवाहाबाहेर असलेल्या प्रकाशनांमधील आहेत. आपण कायम मुख्य प्रवाहावर लक्ष केंद्रित करीत असल्यामुळे त्या चित्तवेधक ठरल्या आहेत. या बातम्या कदाचित फार प्रसिद्धी पावल्या नसल्या तरी या पत्रकारांनी हे मुद्दे ऐरणीवर आणले आहेत,’’ असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of ramanath goenka excellence in journalism awards today amy
First published on: 22-03-2023 at 03:34 IST