बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)-राष्ट्रीय जनता दल युतीचे जंगलराज पुन्हा आले, तर सारे काही नष्ट होईल. त्यामुळे ते संपविण्याची संधी तुमच्या हातात आहे. तसेच भाजप नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यास बिहारला ‘बिमारू’च्या शिक्क्य़ातून बाहेर काढू, असे आश्वासन गया येथील जाहीर सभेत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. जद (यू)-राजद यांच्या संधिसाधू युतीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. मात्र बिहारसाठी अपेक्षित असलेल्या आर्थिक पॅकेजची घोषणा त्यांनी केली नाही.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील जनतेला उद्दामपणात बुडालेल्या सरकारपासून स्वत:ची सुटका करून घेण्याची संधी आहे, असे मोदी म्हणाले. लालू-राबडी यांच्या कार्यकाळातील कुशासनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जंगलराज’चा आपल्या भाषणात वारंवार संदर्भ देऊन मोदी यांनी निवडणुकीनंतर त्यांची सत्ता पुन्हा न आणण्याचा इशारा दिला. तसेच राजद-जद (यू) युतीमधील विसंगतींवर त्यांनी प्रहार केला. जंगलराज भाग- २ पुन्हा आले, तर सारे काही नष्ट होईल. जंगलराजच्या पहिल्या भागात तुरुंगाचा अनुभव नव्हता, तो या वेळी येईल. तुरुंगात काही चांगले शिकता येत नाही, असा टोला मोदींनी लालूप्रसाद यांचे नाव न घेता मारला.
या दोन पक्षांची युती राजकीय संधिसाधूपणातून तयार झालेली असल्याचे सांगून, निवडणुका संपल्यानंतर ही युती टिकेल काय, असा प्रश्न मोदींनी विचारला. बिहारमधील भुजंग प्रसाद कोण आणि चंदन कुमार कोण हे मला माहीत नाही. कुणी तरी विष पाजतोय आणि कुणी तरी ते पितोय, मात्र निवडणुका संपल्यानंतर दोघे मिळून बिहारमध्ये विषारी वातावरण निर्माण करतील, असेही मोदी म्हणाले. बिहार हा ‘बिमारू’ राज्यांच्या श्रेणीतून बाहेर पडावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही भाजप सरकारकडे सत्ता सोपवा, असे आवाहन मोदींनी केले.

हे ट्विटर सरकार : नितीशकुमार

’नितीश कुमार यांनी ट्विटरवरूनच मोदींवर टीका केली. केंद्रातले सरकार हे ट्विटरवरून लोकांची गाऱ्हाणी ऐकते आणि तिथूनच त्यांना प्रतिसाद देऊन कार्य करते. बिहारच्या राज्यपालपदी वरिष्ठ भाजप नेते रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
’बिहारमध्ये राज्यपालांची नियुक्ती करताना राज्य सरकारला विश्वासात घेतलेलेच नाही. राज्यपालांची नियुक्ती करताना कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
’मोदी यांच्या सभेपूर्वी नितीशकुमार यांनी बिहारला विशेष दर्जा, विदेशातील काळा पैसा परत आणणे अशा अनेक मुद्दय़ांवरून त्यांच्यावर टीका केली.