Ram Navami 2024 In Ayodhya : यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे. कारण, गेल्या ५०० वर्षांचा वनवास संपून भगवान राम अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान झाला. त्यामुळे हा दिवस रामभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. आज रामनवमी निमित्त रामावर दुग्धाभिषेक करण्यात आला.

१७ एप्रिलच्या रामनवमीचा उत्साह देशभरात शिगेला पोहोचलेला आहे. राम मंदिर निर्मितीनंतर साजरा होणारा हा पहिलाच जन्मोत्सव असल्याने लाखोंच्या संख्येनं भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रामनवमी संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून १५ ते १८ एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या भाविकांनी १५ ते १८ एप्रिल दरम्यान ऑनलाइन पाससाठी अर्ज केले होते, ते सर्व पासही रद्द करण्यात आले आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीसांनी रामलल्लांच्या जयंतीनिमित्त लोकांना मोबाइल फोन सोबत आणू नका, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा >> Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

भगवान रामावर चांदीच्या भांड्यातून दुग्धाभिषेक

रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. रामलल्लाची मंगल आरती सुरू होण्याच्या एक तास आधीच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. तर, भगवान रामाला दुग्धाभिषेकही करण्यात आला. चांदीच्या भांड्यातून दूध शंखात ओतत आहेत, शंखाद्वारे रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला गेला.

श्रीराम नवमीच्या पावन मुहूर्तावर श्री राम जन्मभूमी मंदिरात प्रभू रामावर दिव्य अभिषेक करण्यात आला, अशी एक्स पोस्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रकडूनकरण्यात आली.

उन्हापासून काळजी घ्या!

अयोध्येतला पारा सध्या चाळीशीपार आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भक्तांचे पाय उन्हाने पोळू नयेत यासाठी खास मॅटही अंथरल्या गेल्या आहेत. भाविकांनी आपलं डोकं झाकून उन्हापासून स्वतःच रक्षण करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.