कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड दिला आहे. २२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने १३५ जागांवर विजय संपादन केला आहे. भाजपाला या निवडणुकीत अवघ्या ६६ जागांवर विजय मिळवता आला. कर्नाटकमधील पराभवामुळे दक्षिण भारतात भाजपाची एकाही राज्यात सत्ता उरली नाही.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय संपादन केला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

हेही वाचा- कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार; दोघांचा राजकीय इतिहास जाणून घ्या

याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसने बैठक बोलावली आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांना या बैठकीसाठी दिल्लीत बोलावलं होतं. डीके शिवकुमार यांनी स्वत: या बैठकीबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनंतर काही तासांतच शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. “मला पोटदुखी सुरू झाल्याने मी आज दिल्लीत जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया डीके शिवकुमार ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली.

“कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. माझ्याकडे एकही आमदार नाही. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? हा निर्णय मी पक्षाच्या हायकमांडवर सोडला आहे,” असं शिवकुमार यांनी सोमवारी सांगितलं. डीके शिवकुमार यांनी अशाप्रकारे अचानक दिल्ली दौरा रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- कर्नाटकात काँग्रेसच्या विजयामागील रणनीतीकार सुनिल कनुगोलू कोण आहेत? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डीके शिवकुमार यांनी सांगितलं होतं की, ते सोमवारी एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ते देवदर्शन करून दिल्लीला जातील. यावेळी शिवकुमार म्हणाले होते, “आमच्या हायकमांडने मला आणि खरगे यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावलं आहे. दिल्लीला जाण्यासाठी मला थोडा उशीर झाला आहे. पण जी फ्लाइट उपलब्ध असेल, त्या फ्लाइटने मी दिल्लीला जाणार आहे.” या घोषणेनंतर काही तासांनी डीके शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला.