Doctor Suspected Of Black Magic In Murder Case: दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. हत्येचा आरोप असलेल्या एका डॉक्टरने न्यायालयात तांदूळ फेकले. पण, यानंतर त्याला न्यायालयाची माफी मागावी लागली तसेच त्याला २००० रुपये दंडही ठोठावण्यात आला.

सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास, १४ वर्षे जुन्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर तीस हजारी न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेफाली बर्नाला टंडन यांच्या न्यायालयात दाखल झाला. कामकाज सुरू असताना, न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड जाणवली आणि त्यांनी न्यायाधीशांना सांगितले की आरोपी डॉक्टर चंदर विभासने न्यायालयात तांदूळ फेकले आहेत.

न्यायालयाने आरोपी डॉक्टरला याप्रकरणी जाब विचारला असता, डॉक्टरने सांगितले की त्याच्या हातात तांदळाचे काही दाणे होते. पण, डॉक्टर हातात तांदूळ का आणले होते याचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही. न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांना सांगितले की, हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. यापूर्वी २ ऑगस्ट रोजीही न्यायालयात तांदळाचे काही दाणे आढळले होते.

आरोपी डॉक्टरने न्यायाधीशांना सांगितले की, तो २ ऑगस्ट रोजीच्या सुनावनीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाला होता. यावर कोर्ट रीडरने ताबडतोब ऑर्डर शीट उघडली आणि त्याचे खोटे बोलणे पकडले आणि तो त्या सुनावणीला न्यायालयात उपस्थित होता, हे स्पष्ट झाले.

यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना काळ्या जादूचा संशय आल्याने ते घाबरले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांकडे न्यायालयाची खोली स्वच्छ करण्याची विनंती केली. या प्रकारामुळे न्यायालयाचे कामकाज सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आले होते.

अत्यंत धक्कादायक आणि…

११ ऑगस्ट रोजीच्या आपल्या आदेशात, अतिरिक्त सत्र न्यायाधीश टंडन म्हणाल्या की, “हे न्यायालयासाठी अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे की आरोपी डॉक्टर, जो व्यवसायाने सर्जन असल्याचे म्हटले जाते आणि शिक्षित आहे, त्याने अशा अनुचित पद्धतीने वर्तन केले आणि न्यायालयीन कामकाजात अडथळा आणला.”

अशा निर्लज्ज कृत्यामुळे…

न्यायाधीश पुढे म्हणाल्या, “न्यायालयाचा अनादर करणे किंवा न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणणे, यामुळे चुकीचा सार्वजनिक संदेश जातो आणि आज आरोपीच्या अशा निर्लज्ज कृत्यामुळे न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आला.” यानंतर, आरोपीने न्यायालयासमोर गुडघे टेकून माफी मागितली.