scorecardresearch

Premium

संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?, केंद्रीय मंत्री

पद्मावती सिनेमच्या वादात आता या केंद्रीय मंत्र्याचीही उडी

संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?, केंद्रीय मंत्री

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमावरून वाद निर्माण झाला आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही उडी घेतली आहे. संजय लीला भन्साळी किंवा इतर कोणत्याही दिग्दर्शकात इतर धर्मावर सिनेमा काढण्याची किंवा त्यावर साधे भाष्य करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न गिरीराज सिंह यांनी उपस्थित केला आहे. भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात. इथून पुढे आम्ही ही बाब सहन करणार नाही असा इशाराच सिंह यांनी दिला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

याआधी पद्मावती सिनेमाच्या वादात केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही प्रतिक्रिया दिली. सिनेमाची निर्मिती करणाऱ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. मात्र या स्वातंत्र्याला मर्यादा असली पाहिजे असेही भारती यांनी स्पष्ट केले आहे. अलाउद्दीन खिलजी हा एक व्याभिचारी हल्लेखोर होता. राणी पद्मावतीवर त्याची वाईट नजर होती. त्याचमुळे त्याने चितौड नष्ट केले. आता या सगळ्या गोष्टी सिनेमात कशाप्रकारे चित्रित केल्या आहेत ते पाहण्यासाठी या सिनेमाचे प्री स्क्रीनिंग करण्यात यावे अशी मागणीही उमा भारती यांनी केली आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उडी घेतली आहे.

‘पद्मावती हा सिनेमा १ डिसेंबर रिलिज होणार आहे. या सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या तिघांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाला अनेक संघटनांकडून सुरूवातीपासूनच विरोध होतो आहे. आता या वादात भाजपच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. भाजपने निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात पद्मावती सिनेमामुळे क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावल्या जातील असे म्हटले आहे. ‘राजपूत करणी सेना’ या संघटनेने सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान तोडफोड केली होती. राणी पद्मावती ही अत्यंत सुंदर आणि स्वाभिमानी राणी होती. तिची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात होतो आहे असा आरोप ‘राजपूत करणी सेने’ने केला आहे. ज्यानंतर पद्मावती या सिनेमाच्या वादाला तोंड फुटले आहे.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-11-2017 at 17:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×