रशिया-युक्रेनचा संघर्ष हे ‘मोदींचे युद्ध’ असल्याचे अजब विधान ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी बुधवारी केले. भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याने त्यांनी त्याप्रमाणे वागावे, असा सल्ला देतानाच त्यांनी भारतावरील ५० टक्के आयात शुल्काचे समर्थन केले.
नव्हारो हे ट्रम्प यांचे व्यापार आणि उत्पादन क्षेत्रासाठीचे वरिष्ठ सल्लागार आहेत. ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भारतावर जोरदार टीका केली. रशियाच्या युद्धाला भारत खतपाणी घालत असल्याच्या ट्रम्प यांच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच भारताच्या कृतीमुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताच्या भरमसाट करांमुळे ग्राहक आणि उद्याोग सर्वच जण तोट्यात आहेत. शिवाय ‘मोदींच्या युद्धा’मुळे अमेरिकेतील करदात्यांच्या पैशांतून युक्रेनच्या सुरक्षेला निधी पुरवावा लागत आहे, असे नव्हारो म्हणाले. त्यावर मुलाखतकाराने ‘पुतिन यांचे युद्ध’ (म्हणायचे आहे का?) असा प्रश्न केला. त्यावर ‘नाही. मोदींचे युद्धच… कारण शांततेच्या मार्गाचा काही भाग, हा नवी दिल्लीतूनही जातो’ असे उत्तर नव्हारो यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले नेते आहेत. भारत ही हुशार नेत्यांकडून चालविली जाणारी परिपक्व लोकशाही आहे. त्यांनी ठरविले आणि रशियाकडून तेल खरेदी थांबविली तर अतिरिक्त २५ टक्के शुल्क उद्याच्या उद्या रद्द होऊ शकेल. – पीटर नव्हारो, ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार