अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे झपाट्यानं पसरत चालेल्या करोना व्हायरसवरून सातत्यानं चीनवर आरोप करत आहेत. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्येही ट्रम्प यांनी करोना व्हायरसच्या प्रसाराचा ठपका चीनवर ठेवला. यावेळी ट्रम्प यांनी करोना व्हायरसचा उल्लेख कुंग फ्लू असा करत चीनवर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनच्या वुहान शहरात करोनाचा विषाणू आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू चीननंतर जगभरात हा विषाणू पसरला. जगभरात या विषाणूनं ४ लाक ५० हजार लोक मरण पावले आहेत. तर ८.५ मिलियन लोकांना संसर्ग झाला आहे. करोना संसर्गानं अमेरिकेत प्रचंड मोठं आव्हान उभं केलं आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडाही मोठा असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह ट्रम्प प्रशासन करोनासाठी चीनवर आरोप करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची शनिवारी ओक्लाहोमामधील तुल्सा येथे प्रचारसभा झाली. यावेळी ट्रम्प यांनी करोनासाठी चीन जबाबदार असल्याचा पुर्नरूच्चार केला. करोनाविषयी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी याला कुंग फ्लू म्हणू शकतो. मी त्याचा उल्लेख १९ वेगवेगळ्या नावांनी करू शकतो. अनेक जण त्याला व्हायरस म्हणतात. जो की तो आहेच. तर अनेक जण त्याला फ्लू म्हणतात. काय फरक आहे. मला वाटत आपल्याकडे करोनाची १९ ते २० नावं आहेत,” असं सांगत ट्रम्प यांनी चीनला डिवचण्याचा प्रयत्न केला. कुंग फू हा चीनमधील मार्शल आर्टचा प्रकार आहे. ज्यात हात व पायांचा वापर करून लढलं जातं.

जॉन हॉपकिन्स करोना व्हायरस केंद्राच्या माहिती प्रमाणे जगात सध्या साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांचे बळी करोना व्हायरसमुळे गेले आहेत. तर ८.५ मिलियन लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत करोना बाधितांची संख्या २.२ मिलियन इतकी आहे. तर मृतांची संख्या १ लाख १९ हजार इतकी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump again blames china for coronavirus terms it kung flu bmh
First published on: 21-06-2020 at 14:00 IST