Donald Trump Aide Peter Navarro Slams Elon Musk Over Fact-Check On X: रशियन तेल खरेदीवरून भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ तणावादरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो हे सतत हास्यास्पद विधाने करत आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अशीच एक हास्यास्पद पोस्ट केली होती. यानंतर एक्सने त्यांचे दावे खोटे असल्याचे सर्वांसमोर उघड केले आणि त्याचे फॅक्ट चेकिंग केले. आता, जगासमोर खोटे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, नवारो यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी, एक्सचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
पीटर नवारो यांची पोस्ट काय होती?
अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एक लेख प्रकाशित केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की ट्रम्प सरकार भारताशी संबंध सुधारण्यासाठी परस्परविरोधी प्रयत्न करत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेने भारताबद्दल वापरलेल्या चिथावणीखोर भाषेमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक कटू होत चालले आहेत.
या बातमीवर टीका करताना, पीटर नवारो यांनी एक्सवर पोस्ट केली की, “फॅक्ट: भारत सर्वाधिक टॅरिफ लादतो ज्यामुळे अमेरिकेचे रोजगार कमी होतात. भारत केवळ नफा मिळवण्यासाठी रशियन तेल खरेदी करतो ज्यामुळे रशियाच्या युद्धयंत्रणेला चालना मिळते. यामुळे युक्रेनियन आणि रशियन नागरिक मरत आहेत. अमेरिकन करदाते जास्त पैसे देतात. भारत सत्य हाताळू शकत नाही. वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकन डाव्या विचारसरणीच्या बनावट बातम्या चालवते.”
एक्सने केले फॅक्ट चेक
नवारो यांच्या या पोस्टवर, एक्सने एका कम्युनिटी नोटसह फॅक्ट चेकिंग केली आणि लिहिले, “भारत रशियाकडून केवळ नफा कमावण्यासाठी नाही तर ऊर्जा सुरक्षेसाठी तेल खरेदी करतो. ते व्यापार निर्बंधांचे उल्लंघन करत नाही. जरी भारतावर टॅरिफ असले तरी, त्यांचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून काही वस्तू आयात करत आहे, हे एक प्रकारचे ढोंग आहे.”
एक्सवरील या कम्युनिटी नोटला “मूर्खपणा” म्हणत, नवारो यांनी एलॉन मस्क यांच्यावर “प्रपोगांडा” परवण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप केला. भारत केवळ नफा कमविण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे या त्यांच्या खोट्या दाव्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला.