Donald Trumps Oil Deal With Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांच्या प्रशासनाने पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या कराराद्वारे दोन्ही देश इस्लामाबादच्या तेलसाठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत.

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याद्वारे पाकिस्तान आणि अमेरिका तेलसाठे विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.”

पोस्टमध्ये पुढे ट्रम्प म्हणाले, “आम्ही या भागीदारीचं नेतृत्व करण्यासाठी तेल कंपनी निवड प्रक्रिया राबवत आहोत. कोण जाणे, कदाचित ते भविष्यात भारतालासुद्धा तेल विकतील.”

ही बाब चांगली नाही…

पाकिस्तानबरोबरच्या कराराची घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५% शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल भारताकडून “एक अनिश्चित दंड” आकारला जाईल.

ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले की, भारतावरील ही कारवाई १ ऑगस्टपासून लागू केली जाईल. ते पुढे म्हणाले, “भारताने नेहमीच आपली लष्करी उपकरणे मोठ्या प्रमाणात रशियाकडून खरेदी केली आहेत आणि चीनसोबतच ते रशियाचे सर्वात मोठे ऊर्जा खरेदीदारही आहेत. रशियाने युक्रेनमधील हत्या थांबवाव्या अशी सर्वजण अपेक्षा करत असताना हा व्यापार होत आहे, ही बाब चांगली नाही.”

भारताचे प्रत्युत्तर

दरम्यान, अमेरिकेने २५ टक्के कर लादल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले. या संदर्भात भारत सरकारने एक पत्रक जारी करत म्हटलं की, भारत सरकारने द्विपक्षीय व्यापाराबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाची दखल घेतली आहे. अमेरिकेच्या २५ टक्के टॅरिफच्या परिणामाबाबत सरकार अभ्यास करत आहे. सरकारने म्हटले आहे की, “भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी वाटाघाटी करत आहे. आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय हितांचं रक्षण

“तसेच सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देतं. युकेसोबतच्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांच्या बाबतीत जे केलं गेलं आहे तसं सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल”, असं निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.