Donald Trump announces TikTok deal after call with Xi Jinping : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी अनेक दिवसांच्या व्यापार संबंधांमधील तणावानंतर प्रथमच फोनवरून संवाद साधला. या संवादानंतर ट्रम्प यांनी लगेचच अमेरिका आणि चीन यांच्यात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकसाठी करार झाल्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी ते पुढील वर्षी चीनला भेट देतील आणि योग्य वेळी शी देखील अमेरिकेचा दौरा करतील असेही यावेळी जाहीर केले.

“मी आत्ताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर फोनवरून खूप उपयुक्त अशी चर्चा पूर्ण केली. यामध्ये आम्ही व्यापार, फेंटानिल, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याची आवश्यकता, आणि टिकटॉक कराराला मंजूरी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती केली,” असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“आम्ही दक्षिण कोरियामधील APEC शिखर परिषदेत भेटू यावर देखील माझे आणि राष्ट्राध्यक्ष शी यांचे एकमत झाले, पुढील वर्षाच्या सुरुवातीला मी चीनला जाईन, आणि त्याच प्रमाणे राष्ट्राध्यक्ष शी हे योग्य वेळी अमेरिकेत येतील. हा फोन कॉल चांगला होता, आणि आम्ही पुन्हा फोनवरून बोलू, टिकटॉकच्या मंजुरीबद्दल मी आनंद व्यक्त करतो, आणि दोघेही APEC मध्ये भेटण्यास उत्सुक आहोत!” असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

यापूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की फोन कॉल हा सकाळी इस्टर्न टाईन ८ वाजता (१२०० GMT)  सुरू झाला आणि यामध्ये व्यापारावर देखील चर्चा झाली. चीन सरकारी चॅनल सीसीटीव्हीने या संवादाची पुष्टी केली आहे, मात्र यातील तपशील उघड केलेला नाही.

दरम्यान टिकटॉकची मूळ कंपनी ByteDance ने त्यांची अमेरिकेतली मालमत्ता विकली नाहीतर जानेवारी २९२५ पर्यंत अमेरिकन वापरकर्त्यांसाठी टिकटॉक बंद करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. पण ट्रम्प यांनी विक्रीसाठी वेळ हवा असल्याचे आणि अमेरिकेत टिकटॉक वापरणाऱ्या मोठ्या समुदायाला नाराज करायचे नसल्याचे सांगत हे आदेश लागू केले नाहीत.