Donald Trump on India vs Pakistan Tension : अमेरिकेने पाकिस्तान व भारतातील युद्धविरामाच्या चर्चेत मध्यस्थी केल्याचा अमेरिकेचा दावा भारताने अलीकडेच फेटाळून लावला आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचा दावा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. सौदी अरबच्या रियाध येथील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
ट्रम्प हे सध्या सौदी अरबच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (१३ मे) ते रियाधमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “जगात शांतता प्रस्थापित होईल अशी मला आशा आहे.” तसेच ट्रम्प यांनी यावेळी सीरियाजे माजी अध्यक्ष बशर अल-असद यांच्या राजवटीच्या काळात अमेरिकेने सीरियावर लावलेले दीर्घकालीन निर्बंध अमेरिका आता हटवत असल्याची घोषणा केली. जगात शांतता व एकात्मता प्रस्थापित करणे हे आमचे उद्दीष्ट आहे असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
आम्ही तीन आठवड्यात आयसिसचा पाडाव केला : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, मला युद्ध आवडत नाही. मी तीन आठवड्यात आयसिसचा पाडाव केला. आम्ही आयसिसविरोधात मोहीम उघडली तेव्हा अनेकजण आम्हाला सांगत होते की या कामाला चार ते पाच वर्षे लागतील. मात्र आमच्या लष्कराने अवघ्या तीन आठवड्यात ती कामगिरी साध्य केली.
मी भारत व पाकिस्तानला अणू हल्ले करण्याऐवजी व्यापाराचा सल्ला दिला : डोनाल्ड ट्रम्प
जगात शांतता प्रस्थापित करण्याचा वक्तव्याचा पुनरुच्चार करताना ट्रम्प यांनी अलीकडच्या भारत-पाकिस्तान युद्धबंदीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, मी भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना सांगितलं होतं की एकमेकांवर अणू हल्ले करण्याऐवजी वस्तूंची देवाणघेवाण करा,व्यापार करा.
“मी भारत व पाकिस्तानला म्हटलं, चला आपण व्यापार करुया”
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच आमच्या प्रशासनाने ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला. यासाठी मी व्यापारी धोरणांचा वापर केला. यासाठी मी व्यापारी धोरणांचा वापर केला. मी त्यांना (भारत व पाकिस्तान) म्हटलं की चला एक करार करुया, आपण व्यापार करुया. आण्विक शस्त्रांस्रांचा वापर करू नका. उलट तुम्ही निर्माण केलेल्या सुंदर गोष्टींचा व्यापार करुया. दोन्ही देशांत खूप शक्तीशाली नेते आहेत. ते सगळेजण थांबले. मला आशा आहे की हे चित्र असंच राहील.