Republican leader Remark on Lord Hanuman Statue in Texas Sparkd Row in US : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीमधील एका नेत्याने हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या भगवान हनुमानााबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हनुमानाची ९० फूट उंच मूर्ती आहे. या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ देखील म्हटलं जातं. या मूर्तीबाबत रिपब्लिकन नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. अमेरिका हे ख्रिस्ती राष्ट्र असल्याचं सांगत रिपब्लिकन नेते अलेक्झांडर डंकन यांनी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती उभारण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
टेक्सासमधील शुगरलँड शहरातील श्री अष्टलक्ष्मी मंदिरातील भगवान हनुमानाच्या मूर्तीचा एक व्हिडीओ अलेक्झांडर डंकन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की “आपण इथे टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवांच्या खोट्या मूर्ती उभारण्याची परवानगी का देतोय? आपण एक ख्रिस्ती राष्ट्र आहोत.”
बायबलचा दाखला देत आणखी एक वक्तव्य
अलेक्झांडर यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बायबलचा (ख्रिस्ती धर्मग्रंथ) दाखला देत म्हटलं आहे की “बायबलमध्ये म्हटलंय की तुमच्याकडे माझ्याशिवाय दुसरा कोणताही देव असता कामा नये. तुम्ही तुमच्यासाठी स्वर्ग, पृथ्वी किंवा समृद्रात कुठल्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा उभारता कामा नये.”
अलेक्झांडर डंकन यांच्यावर टीकेचा भडीमार
टेक्सासमधील भगवान हनुमानाची मूर्ती ही अमेरिकेतील तिसरी सर्वांत उंच मूर्ती आहे. या मूर्तीवर अलेक्झांडर यांनी आक्षेप घेतल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्यावर बरीच टीका होऊ लागली आहे.
अलेक्झांडर यांच्या या वक्तव्यावर हिंदू अमेरिकन फाउंडेशनने आक्षेप नोंदवला आहे. संस्थेने अलेक्झांडर यांची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की “तुमचं वक्तव्य हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर आहे.” दरम्यान, संस्थेने अधिकृतपणे रिपब्लिकन पार्टीकडे अलेक्झांडर यांची तक्रार केली आहे. यासंदर्भात निवेदन देखील दिलं आहे. यासह त्यांनी अलेक्झांडर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हिंदू अमेरिकन फाउंडेशनने रिपब्लिकन पार्टी ऑफ टेक्सासला पोस्टमध्ये टॅग करत म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाच्या सीनेट उमेदवाराला अनुशासन कराल का? कारण ते खुलेआम भेदभाव पसरवत आहेत. तुमच्या पक्षाच्या मार्गदर्शक सूचनांना त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.