Donald Trump Confession On India and Russia: भरमसाठ टॅरिफ, रशियाकडून तेल खरेदी आणि व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींमुळे भारत आणि अमेरिकेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “असे दिसत आहे की, आपण भारत आणि रशियाला चीनला गमावल्यासारखे दिसते आहे.” यावेळी ट्रम्प यांनी तिन्ही देशांना उपरोधिकपणे “समृद्ध” भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच ट्रम्प यांनी पोस्टबरोबर मोदी, जीनपिंग आणि पुतिन यांचा एकत्रित फोटोही शेअर केला आहे.
मोदी, पुतिन, जीनपिंग यांचे शक्तिप्रदर्शन
या आठवड्याच्या सुवातीला चीनच्या तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद झाली. यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच केल्याचे पाहायला मिळाले होते.
ट्रम्प यांही पोस्ट म्हणजे, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे भारत, रशिया आणि चीनमधील संबंध दृढ होत चालले आहेत, याची जाहीर कबुलीच आहे.
दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान तिन्ही देशांच्या नेत्यांनी ऊर्जेपासून सुरक्षेपर्यंत अशा सर्व क्षेत्रात सहकार्य करण्यावर सार्वजनिकपणे चर्चा केली, ज्यामध्ये युक्रेनमधील युद्ध आणि जागतिक व्यापार धोरणासह इतर मुद्द्यांवर अमेरिकेबरोबर असलेल्या मतभेदांचाही समावेश होता.
भारत-अमेरिका संबंध
गेल्या अनेक दशकांपासून, अमेरिकेने भारताकडे चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी एक संभाव्य भागिदार म्हणून पाहिले आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांच्या प्रशासनांनी भारताला एक धोरणात्मक भागीदार म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न केले आहेत. ट्रम्प यांनी स्वतः त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारताला भेट दिली होती. त्यानंतर २०१९ च्या ह्युस्टनमधील “हाउडी मोदी” रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित राहिले होते.
तरीही अलिकडच्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचे टॅरिफ उपाय आणि रशियासोबतच्या भारताच्या ऊर्जा व्यापारावरील टीका यामुळे अमेरिकेची पकड कमकुवत झाली आहे.
पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतरचा पहिल्यांदा चीन दौऱ्यावर
शाघाय सहकार्य परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वर्षांनंतरचा पहिल्यांदा चीन दौऱ्यावर गेले होते. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या प्राणघातक सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट दोन्ही देशांसाठी महत्त्वाची होती. शी जीनपिंग आणि पुतिन यांना भेटून, पंतप्रधान मोदींनी कोणत्याही एका गटाबरोबर राहण्यापेक्षा धोरणात्मक स्वायत्तता ठेवण्याच्या तयारीचे संकेत दिले आहेत.