वृत्तसंस्था, कीव्ह
रशिया आणि युक्रेन थांबवण्यासाठी आपण सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहोत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावरून केली. रक्तपात थांबवणे हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय असेल असे ट्रम्प यांनी लिहिले आहे.
पुतिन यांच्याबरोबर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि नाटोच्या सदस्यांशीही बोलणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. या चर्चांमधून ठोस रचनात्मक काही घडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, रशियाच्या ड्रोनने शनिवारी केलेल्या हल्ल्यात ईशान्य युक्रेनच्या सुमी प्रांतामध्ये नऊ जण ठार झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय या हल्ल्यात सातजण जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा जाणीवपूर्वक नागरिकांची हत्या घडवण्याचा प्रकार असल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली.
युद्ध सुरू असलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात असताना एका बसला ड्रोनने लक्ष्य केले. रशिया आणि युक्रेनदरम्यान शुक्रवारी थेट चर्चेची पहिली फेरी झाल्यानंतर काहीच तासांमध्ये हा हल्ला झाला.