Donald Trump got angry with journalist : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ओव्हल ऑफिसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ट्रम्प एका पत्रकारावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. या पत्रकाराने कतार सरकराने एक अत्यंत आलिशान विमान अमेरिकेला भेट म्हणून दिल्यासंबंधी प्रश्न विचारला होता. यावर संतापलेल्या ट्रम्प यांनी पत्रकाराला ‘वाईट वार्ताहर’ म्हणत त्याला बाहेर जाण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
कतार सरकारकडून ४०० दशलक्ष डॉलर किंमतचे बोईंग ७४७-८ जेट भेट म्हणून दिल्याबद्दल पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. कतारने दिलेले हे विमान एअर फओर्स वनच्या ऐवजी वापरले जाणार असल्याच्या चर्चा आहेत . मात्र यासंबंधी प्रश्न ऐकताच डोनाल्ड ट्रम्प पत्रकारावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. “तुम्ही त्याबद्दल का बोलत आहात? तुम्ही त्याबद्दल कशासाठी विचारत आहात? तुम्ही इथून चालते व्हा.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांना दक्षिण आफ्रिकेतील श्वेत वर्णाच्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्ह्यांसंबंधी ५ मिनिटांचा व्हिडीओ दाखवल्यानंतर लगेच एनबीसी न्यूजचे वार्ताहर पिटर अलेक्झेंडर यांच्याकडून कतारच्या विमानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
यावेळी ट्रम्प यांनी रिपोर्टर आणि एनबीसी न्यूज नेटवर्कवर श्वेत वर्णाच्या दक्षिण आफ्रिकेतील शेतकर्यांविरोधातील गुन्ह्यांचा वादग्रस्त विषय टाळल्याचा आरोप केला. ट्रम्प यांनी प्रश्न उपस्थित केला की, “याचा कतार जेटशी काय संबंध आहे? ते युनायटेड स्टेट्स एअर फोर्सला जेट देत आहेत. ठीक आहे?आणि ही चांगली गोष्ट आहे.”
After President Trump shows videos about genocide, @PeterAlexander asks about jet from Qatar.
— CSPAN (@cspan) May 21, 2025
President Trump: ""What are you talking about? You know, you oughta get out of here…you're a terrible reporter." pic.twitter.com/4KgjHOvEUF
ओव्हल कार्यालयात रामाफोसा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांना एक पाच मिनिटांची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. ज्यामध्ये श्वेत वर्णाच्या सुमारे हजार दक्षिण अफ्रिकन नागरिकांच्या सामूहिक कबरीचं ठिकाण दाखवण्यात आलं, ज्यांना त्यांच्या वंशाच्या आधारावर जमीन जप्त करताना ठार करण्यात आलं, असा दावा ट्रम्प यांनी केला. हा व्हिडीओ दाखवण्यात आल्यानंतर रामाफोसा यांनी ट्रम्प यांच्याकडे याबद्दल अधिक माहिती आणि या जागेचे लोकेशनची मागणी केली.
यानंतर एनबीसी न्यूजचे रिपोर्टर अलेक्झांडर यांनी लगेचच कतार जेटचा प्रश्न विचारला. या प्रश्नावर संताप व्यक्त करत ट्रम्प म्हणाले की, “आपण इतर अनेक गोष्टींबद्दल बोलत आहोत. तुम्ही आत्ताच जे पाहिलं त्या विषयापासून एनबीसी दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे का?”