Donald Trump On Attacking Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणवर इस्रायलबरोबर हल्ला करणार की इराणच्या अणु पायाभूत सुविधांना लक्ष्य करणार, यावर स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “मी हल्ला करू शकतो, कदाचित करणारही नाही. मी काय करणार आहे, हे कोणालाही माहिती नाही.”
इराणने संपर्क साधला असला तरी चर्चेसाठी आता खूप उशीर झाला आहे, आणि लवकरच कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिले. “पुढील आठवडा मोठा असेल,” असेही ते म्हणाले.
“मागचा आठवडा आणि सध्याची परिस्थिती यामध्ये आता खूप फरक आहे, मी काय करणार आहे हे कोणालाही माहिती नाही”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसबाहेर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, इराणने व्हाइट हाऊसमध्ये चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु त्यांनी या चर्चेचे स्वरूप किंवा वेळेबाबत तपशीलवार माहिती दिली नाही. यावेळी ट्रम्प यांनी इराणचे वर्णन “पूर्णपणे असुरक्षित, कोणत्याही प्रकारचे हवाई संरक्षण नसलेला” देश असे केले.
इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांच्याबद्दल विचारले असता, ट्रम्प यांनी फक्त “शुभेच्छा” असे म्हटले. इराणबद्दल त्यांच्या प्रशासनाचा संयम आता संपला आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या योजनांवर अमेरिका इस्रायलसोबत काम करत असल्याच्या बातम्या येत असताना, ट्रम्प यांनी यापूर्वी असा दावा केला होता की खामेनी कुठे “लपले आहेत” हे अमेरिकेला नक्की माहित आहे. भविष्यातील हल्ल्या करणार की नाही याचे स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करताना, ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की अमेरिका या टप्प्यावर त्यांना “बाहेर काढणार नाही”, परंतु अमेरिकेचा संयम “खचत चालला आहे” असा कडक इशारा दिला. त्यांनी इराणच्या “बिनशर्त आत्मसमर्पणाची” मागणी देखील केली आणि म्हटले की इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही.
इस्रायलशी वाढत्या तणावादरम्यान आणि इराणने शरणागती पत्करावी असे अमेरिकेने म्हटल्यानंतर, अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी ही शक्यता ठामपणे नाकारली आणि इराण कधीही शरणागती पत्करणार नाही असे जाहीर केले. त्यांनी इशारा दिला की अमेरिकन लष्करी हस्तक्षेपाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, ज्यामुळे अमेरिकेचे “अपरिहार्य नुकसान” होईल.