Donald Trump Announces Iran-Israel Ceasefire: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी करार झाल्याची घोषणा केली आहे.
युद्धबंदीची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, “सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराण यांनी १२ तासांसाठी शस्त्रविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली असून या काळात दोन्ही देश त्यांच्या अंतिम मोहिमा पूर्ण करतील. त्यानंतर हे युद्ध संपले आहे, असे अधिकृतपणे मानले जाईल.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “युद्धबंदीची सुरुवात इराणकडून होईल आणि त्यानंतर १२ तासांनी इस्रायलही युद्धबंदीला सुरुवात करेल. २४व्या तासाला, १२ दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल. युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील.”
आपल्या पोस्टच्या शेवटी ट्रम्प म्हणाले की, “जर सर्वकाही नियोजनाप्रमाणे पार पडले (आणि तसेच होईल, अशी माझी खात्री आहे), तर मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी संयम, धैर्य आणि दूरदृष्टी दाखवून ‘१२ दिवसांचे युद्ध’ समाप्त केले. हे असे युद्ध होते, जे वर्षानुवर्षे चालू शकले असते आणि संपूर्ण मध्य पूर्वेचा नाश करू शकले असते, पण तसे झाले नाही आणि कधीच होणार नाही!”
१३ जूनपासून सुरू झालेल्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या ११व्या दिवशी, रविवारी, अमेरिकेने उघडपणे त्यात उडी घेतल्याने याला एक नवीन वळण मिळाले होते. अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य करत त्यावर हवाई हल्ले केले होते. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणु प्रकल्पांचा समावेश होता.
यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालटाचे समर्थन केले होते. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत लिहिले की, “शासनबदल हा शब्द वापरणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही, परंतु जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवू शकत नसेल, तर राजवट का बदलू नये??? इराणला पुन्हा महान बनवा!!!”
इराणने नाकारला युद्धबंद्धीचा दावा
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धबंधीनंतर आता इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी, सध्या युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही “करार” झालेला नाही असे म्हटले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “इराणने वारंवार स्पष्ट केले आहे की, हे युद्ध इस्रायलने सुरू केले आहे. सध्या तरी, कोणत्याही युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही “करार” झालेला नाही. पण, जर इस्रायलने इराणच्या वेळेनुसार पहाटे ४ वाजेपर्यंत बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर, त्यानंतर हल्ले करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आमच्या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.”