अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदावर निवडून आलेल्या झोहरान ममदानी यांची थट्टा केली आहे. ‘मंदामी, की कोण, काहीही नाव त्यांचे असो…’ असे संबोधून ‘अमेरिकेला आता साम्यवाद आणि सामान्य बुद्धी (कॉमन सेन्स) यापैकी एकाची निवड करायची आहे,’ असे ते म्हणाले.
अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी निवडून आले. पहिले दक्षिण आशियायी, पहिले मुस्लिम आणि न्यूयॉर्कच्या १०० वर्षांहून जुन्या इतिहासातील सर्वांत तरुण महापौर ते असतील. ट्रम्प म्हणाले, ‘‘मी जेव्हा अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आलो, तेव्हा अमेरिकेच्या नागरिकांनी त्यांचे सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित केले. आता महापौरपदाच्या निवडणुकीत थोडेसे पुन्हा गमावले आहे. पण आम्ही त्याची काळजी घेऊ. याची काही चिंता नको. न्यूयॉर्कमध्ये जे काही घडले, ते भयंकर आहे, तुम्ही ते पाहिले…हे होणार नाही, असे मला वाटले होते… आणि मंदामी, जे काही त्यांचे नाव आहे, ते न्यूयॉर्कमध्ये आहेत… महिलांच्या खेळात पुरुष खेळताना पाहून अद्भुत वाटले.’’
ममदानी यांची निवड ही आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठी हानी असेल, असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या शहरात साम्यवादी व्यक्तीला उभे केल्याचा आरोप त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर केला.
‘ममदानी यांचे भाषण संतापी’
निवडणूक जिंकल्यानंतर ममदानी यांनी केलेले भाषण माझ्याप्रति अतिशय संतापी होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘‘त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने सुरुवात केली आहे. वॉशिंग्टनप्रति (ट्रम्प सरकार) त्यांचा आदर नसेल, तर त्यांना यश मिळण्याची कुठलीही संधी नाही. पुढे अनेक गोष्टींना माझ्याच माध्यमातून मंजुरी मिळणार आहे. त्यांनी आता सुरुवातच वाईट केली आहे,’’ अशी टीका ट्रम्प यांनी केली.
भारतीय-अमेरिकी समुदायाकडून स्वागत
न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकी समुदायाने ममदानी यांचे अभिनंदन केले. ममदानी यांचा विजय ऐतिहासिक असून, अमेरिकेत स्थलांतरितांचा आवाज आता ऐकला जाईल, अशी प्रतिक्रिया समुदायातून व्यक्त करण्यात आली. न्यूयॉर्कमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष अनू सेहगल यांनी भारतीय वंशाच्या ममदानी यांचे स्वागत केले.
‘ज्यू नागरिकांच्या संरक्षणाचे उद्दिष्ट’
ममदानी यांच्या विजयानंतर अमेरिकेमधील ज्यू-विरोधावर काम करणाऱ्या ‘अँटि डेफमेशन लीग’ने (एडीएल) न्यूयॉर्कमधील ज्यू नागरिकांच्या संरक्षणार्थ पावले उचलली आहे. ‘न्यूयॉर्कमध्ये अनपेक्षितरीत्या ज्यूविरोध तयार झाल्यामुळे ज्यू नागरिकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘एडीएल’ने दिली.
