Donald Trump On Argentina : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक देशांवर टॅरिफ लादलं. ट्रम्प यांच्या टॅरिफचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर टॅरिफच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे कधी चीनला तर कधी भारताला तर कधी रशियाला धमकी देताना दिसून आले आहेत. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा मोर्चा अर्जेंटिनाकडे ओळवल्याचं दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अर्जेंटिनाला थेट आर्थिक रसद बंद करण्याची धमकी दिली आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे निवडणूक हरल्यास आम्ही अर्जेंटिनाची आर्थिक रसद बंद करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी २० अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जर एखादा नेता मध्यावधी निवडणुका जिंकू शकला नाही तर आम्ही उदार होणार नाहीत, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी अर्जेंटिनाला सुनावलं आहे. या संदर्भातील वृत्त द गार्डियनने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“जर ते (झेवियर मिलेई) हरले तर आपण अर्जेंटिनासाठी उदार राहणार नाही”, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. ट्रम्प म्हणाले की, “मी या माणसाबरोबर आहे. कारण ते हुशार आहेत. ते निवडणूक जिंकू शकतात. ते निवडणूक का जिंकू शकत नाहीत? मला वाटतं की ते निवडणूक जिंकतील. ते जिंकले तर आपण त्यांच्याबरोबर असू.”

अर्जेंटिनाच्या अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने तब्बल २० अब्ज डॉलर्स देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. दरम्यान, यावेळी ट्रम्प यांनी झेवियर मिलेई यांचं कौतुक महान नेता असंही केलं. ट्रम्प म्हणाले की, ते निवडणुकीत त्यांच्या वैचारिक सहयोगीला पूर्णपणे समर्थन देतील. अमेरिकेला काय फायदा झाला? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले की, “आम्ही एका महान व्यक्तीला देशावर सत्ता मिळवण्यास मदत करत आहोत. आम्हाला ते यशस्वी झालेलं पहायचं आहे”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, ट्रम्प यांनी वारंवार झेवियर मिलेई यांना राजकीय पाठिंबा दिला आहे, तसेच अमेरिकेने २० अब्ज डॉलर्सच्या कराराची घोषणाही केलेली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अर्जेंटिनाच्या बाजारपेठा अजूनही अस्थिर आहेत.