Donald Trump on World War III : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी काही तासात राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान अमेरिकेचे दुसर्‍यांदा अध्यक्ष बनण्यापूर्वी ट्रम्प यांनी तिसर्‍या जागतिक महायुद्धाबद्दल मोठं भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या सीमेवर होत असलेले हल्ले देखील रोखण्याच्या त्यांच्या आश्वासनाचाही पुनरुच्चार केला. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ट्रम्प आपल्या प्रचारात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या सभेत त्यांच्या समर्थकांना संबोधित केले.

कॅपिटल वन एरिना येथे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) विजय रॅलीमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही त्यांना सर्वोत्तम पहिला दिवस, सर्वात मोठा पहिला आठवडा आणि अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांच्या कारकि‍र्दीचे पहिले सर्वात असाधारण १०० दिवस देणार आहोत”. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी जो बायडेन यांचे काही कार्यकारी निर्णय देखील माघारी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

उद्या सूर्य मावळण्याच्या आधी आपल्या देशाच्या सीमेवर होणारे आक्रमण थांबेल, असे आश्वासन देखील ट्रम्प यांनी यावेळी दिले. सर्व बेकायदेशीर सीमेवर घुसखोरी करणारे, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, त्यांच्या घरी परत जातील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले की, “आपण आपल्या मालमत्तेवर पुन्हा दावा करणार आहोत, आम्ही आमच्या अगदी पायाखाली असलेलं लिक्विड गोल्ड खुलं करणार आहोत”.

ट्रम्प यांनी जोर देऊन सांगितलं की, त्यांचे प्रशासन त्वरित देशाच्या सीमांवर पुन्हा नियंत्रण मिळवेल. त्याबरोबरच आम्ही अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी डिपोर्टेशन एक्सरसाइज सुरू करू, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले. ही मोठी मोहीम असेल ज्याच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढले जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार असून यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो.

“यापूर्वी, खुल्या सीमा, तुरूंग, मानसिक रूग्णांची काळजी घेणार्‍या संस्था, महिलांच्या खेळात खेळणारे पुरुष, सर्वांकडून ट्रान्सजेंडर लोकांना मिळणारा पाठिंबा याचा कोणी विचारही करू शकत नव्ंते. आम्ही प्रत्येक बेकायदेशीर परदेशी गँग सदस्य आणि अमेरिकेच्या जमिनीवर कार्यरत असलेल्या स्थलांतरित गुन्हेगारांना देशा बाहेर काढू”, असेही ट्रम्प म्हणाले.

तर गाझा युद्ध घडलंच नसतं…

गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यातील १ महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचे श्रेय देखल ट्रम्प यांनी घेतले. तसेच त्यांनी दावा केला की, ते राष्ट्राध्यक्ष असते तर युद्ध झालेच नसते. “आम्ही मध्यपूर्वेतील दीर्घकाळ शांततेच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एक महत्त्वाचा युद्धविराम करार करण्यात यशस्वी झालो आहोत. हा करार फक्त नोव्हेंबरमध्ये आम्ही मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळेच शक्य होऊ शकला. पहिल्या ओलीसांची नुकतीच सुटका झाली आहे. बायडेन म्हणाले की त्यांनी हा करार केला. खरंतर मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे (गाझा युद्ध) कधी घडलंच नसतं”, असेही ट्रम्प म्हणाले.

रविवारी तीन इस्त्रायली ओलीसांची हमासकडून सुटका करण्यात आली, हमासने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी हल्ला केल्यानंतर ४७१ दिवसांनंतर या ओलीसांची सुटका करण्यात आली आहे. याबदल्यात इस्त्राइलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांना तुरूंगातून मुक्त केले आहे.

“आमच्या आगमी प्रशासनाने मध्यपूर्वेत तीन महिन्यांपेक्षा कमी काळात हे सर्व साध्य केले आहे. अध्यक्ष असताना त्यांनी चार वर्षात जे साध्य केलं, त्यापेक्षा जास्त अध्यक्ष नसताना साध्य केलं आहे”, असेही ट्रम्प म्हणाले. “मी युक्रेनमधील युद्ध संपवीन, मी मध्य पूर्वेतील गोंधळ थांबवीन आणि मी तिसरे महायुद्ध होण्यापासून थांबवेन. आणि आपल्याला कल्पना नाही की आपण त्याच्या किती जवळ आहोत”, असेही ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पदभार स्वीकारल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, माजी यूएस ऍटर्नी जनरल रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागजपत्रे जारी करण्याची घोषणा देखील केली आहे.