Donald Trump on Orders Nuclear Weapons Tests : अण्वस्त्रांबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की “अमेरिकेकडे जगातील कुठल्याही देशापेक्षा अधिक अण्वस्त्र आहेत. माझ्या कार्याकाळातच अमेरिकेने ही गोष्ट साध्य केली आहे.” अण्वस्त्रांच्या बाबतीत ट्रम्प यांनी रशियाला दुसऱ्या स्थानी व चीनला तिसऱ्या स्थानी ठेवलं आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की चीन पुढच्या पाच वर्षांमध्ये अमेरिकेची बरोबरी करू शकतो. मात्र, सध्या चीनकडे अमेरिका व रशियाच्या तुलनेत फार कमी अण्वस्त्र आहेत.
ट्रम्प यांनी केलेल्या या पोस्टची वेळ खूप महत्त्वाची आहे. कारण ट्रम्प पुढच्या काही तासांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. जिनपिंग यांना भेटण्यापूर्वी ट्रम्प यांनी केलेल्या या पोस्टमध्ये ही अमेरिकेची कुठली चाल आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आपल्याकडे दुसरा पर्याय नाही : डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प यांनी ट्रुथवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की अमेरिकेकडे जगातील कुठल्याही देशापेक्षा अधिक अण्वस्त्र आहेत. अमेरिकेने ही कामगिरी माझ्या कार्यकाळातच केली आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया दुसऱ्या व खूप कमी अण्वस्त्रांसह चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, पाच वर्षांत ते आपली बरोबरी करू शकतात. खरंतर, अण्वस्त्रांची संख्या वाढवणं किंवा त्यांची निर्मिती करणं मला योग्य वाटत नाही. परंतु, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला त्यांची चाचणी व निर्मिती करावी लागेल.
ट्रम्प यांचे तातडीने अण्वस्त्र निर्मिती करण्याचे आदेश
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इतर देशांच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे मी आपल्या युद्ध विभागाला आदेश दिले आहेत की आपण इतर देशांमधील अण्वस्त्र निर्मितीच्या अनुषंगाने आपल्याकडे अणू चाचणी व अण्वस्त्र निर्मिती सुरू करावी. ही प्रक्रिया तातडीने सुरू होईल.”
ट्र्म्प यांचं हे वक्तव्य त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचं एक उदाहरण आहे. ट्रम्प अण्वस्त्रांना राष्ट्रीय सुरक्षेचं प्रतीक मानतात. त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ ते २०२१ दरम्यान ट्रम्प प्रशासनाने अण्वस्त्र निर्मिती व त्यांच्या आधुनिकीकरणावर ४४ अब्ज डॉलर्स खर्च केले होते. ज्यामध्ये बी-६१ बॉम्ब अपग्रेड करणे आयसीबीएमची (इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइल) निर्मिती वाढवण्याचा समावेश होता.
