एपी, वॉशिंग्टन
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अठराव्या शतकातील कायद्याचा वापर करून व्हेनेझुएलाच्या ‘ट्रेन द ॲरग्वा’ यासारख्या गटांना देशाबाहेर काढता येणार नाही, असा निकाल फेडरल अपील्स कोर्टाच्या पॅनेलने दिला. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या काही गटांवर ते टोळ्यांचे सदस्य आहेत असा आरोप करून अमेरिकेतून बाहेर काढण्यासाठी १७९८च्या ‘एलियन एनिमीज ॲक्ट’चा वापर करण्याची परवानगी दिली होती.
फेडरल न्यायालयाच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या मुख्य स्थलांतरविरोधी धोरणामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आता या निकालाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यास तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल. अमेरिकेच्या ‘५व्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’च्या तीन सदस्यीय पीठाने २ विरुद्ध १ अशा बहुमताने निर्णय दिला.
‘५वे यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’ हे अमेरिकेतील सर्वात रूढीवादी न्यायालय म्हणून ओळखले जाते. ‘एलियन एनिमीज ॲक्ट’ हा युद्धकालीन कायदा असून ट्रेन द ॲरग्वासारख्या गटांविरुद्ध वापर केला जाणे हा त्या कायद्याचा हेतू नव्हता असा युक्तिवाद स्थलांतरितांच्या अधिकारांसाठी लढणारे वकील आणि कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केला. तो ‘सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’ने मान्य केला.