Donald Trump on Nobel Peace Prize : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही तर हा त्यांच्या देशाचा म्हणजेच अमेरिकेचा अपमान ठरेल. ते म्हणाले “मी माझ्या अध्यक्षपदाच्या आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सात युद्ध रोखली आहेत.” हा दावा त्यांनी ५० हून अधिक वेळा केला आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा त्याच दाव्याचा पुनरुच्चार करत शांततेच्या नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे.
मागील दोन वर्षांत हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला इस्रायल-हमास संघर्ष संपुष्टात यावा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी २० मुद्द्यांचा समावेश असलेला शांततेचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्ध रोखल्याची बतावणी करत शांततेचा नोबेल पुरस्कार मागितला आहे. यासह ते म्हणाले, “इस्रायल व हमासमधील युद्ध थांबल्यानंतर हे माझं आठवं यश असेल. मी रोखलेलं हे आठवं युद्ध असेल.”
अमेरिकन जनतेला उद्देशून ट्रम्प म्हणाले, “आपण सात महिन्यांमध्ये सात युद्ध रोखली आहेत. आता इस्रायल व हमासमधील युद्ध थांबवण्यात आपल्याला यश मिळेल असं दिसतंय. म्हणजेच आठ महिन्यात आठवं यश. तरी देखील मला नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.”
मला माझ्या देशासाठी नोबेल पुरस्कार हवा आहे : डोनाल्ड ट्रम्प
“भारत-पाकिस्तानसारखी युद्ध आपण रोखली, एवढं करूनही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळेल का? अजिबात नाही. हा पुरस्कार अशा एखाद्या व्यक्तीला दिला जाईल ज्याने काहीही केलेलं नसेल. असं झाल्यास हा आपल्या देशाचा मोठा अपमान असेल. मला हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी हवा आहे. कारण असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही. “
“ते लोक अशा व्यक्तीला शांततेचं नोबेल पारितोषिक देतील ज्याने कुठलंही युद्ध थांबवलेलं नसेल, ज्याने केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी काय केलं याबाबत पुस्तक लिहिलेलं असेल. अशा एखाद्या लेखकाला ते पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जाईल. काय होतंय ते आपण बघुया. आपल्याला हा पुरस्कार मिळाला नाही तर तो आपल्या देशाचा अपमान ठरेल.”
येत्या १० ऑक्टोबर रोजी नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. तत्पूर्वी शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प सातत्याने स्तवःची योग्यता स्वतःच सांगत फिरत आहेत.